पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू असतानाच नाराजीनाट्य; शहराध्यक्षांना कार्यकर्त्यांसमोरच अश्रू अनावर
पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर; शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना अश्रू अनावर; बैठक अर्धवट सोडून गेले निघून.
Discontent erupts as Shinde’s Shiv Sena meeting continues in Pune : राज्यभरात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून अवघ्या १५ दिवसांवर निवडणूक येऊन ठेपल्या आहेत. जागावाटपावरून महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्या कुठे एकमत होताना दिसत नाहीये. त्यातच आता महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीचं टेन्शन वाढलं असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेतील(Shivsena) वाद चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील(Pune) शिवसेनेच्या अंतर्गत वादाला आता तोंड फुटलं आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरू असताना मोठा गोंधळ झाला. या गोंधळानंतर शिवसेनेचा एक नेता बैठक अर्धवटचं सोडून तिथून निघून गेला. यामुळेच आता पुन्हा अनेकदा महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक सुरू होती. या बैठकीला शिवसेनेच्या नीलम गोर्हे, विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर आणि शहरप्रमुख नाना भानगिरे देखील उपस्थित होते.
Video : पुण्यातील गुंड बंडू आंदेकरसह सून अन् भावजय निवडणुकीच्या मैदानात; पक्ष कोणता?
बैठक सुरू असतानाच अंतर्गत नाराजीचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं. पुणे शहरातील पक्षाच्या आढावा बैठकीत शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांना अश्रू अनावर झाले आहेत. बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच ते बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले. शिवसेना पक्षाच्या या बैठकीत पक्षातील संघटनात्मक कामकाज, जबाबदाऱ्या आणि स्थानिक पातळीवरच्या राजकारणावर चर्चा सुरू होती. मात्र बैठकीदरम्यान काही नेत्यांकडून झालेल्या टीका, दुर्लक्ष आणि नाराजीमुळे नाना भानगिरे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांसमोरच त्यांना अश्रू अनावर झाल्याने एकचं खळबळ उडाली.
दरम्यान या घटनेनंतर भानगिरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता बैठकीतून काढता पाय घेतला. आधीच जागावाटप, पदं आणि निर्णयप्रक्रियेवरून नाराजीचे सुर उमटत असतानाच आता थेट बैठकीत घडलेल्या या नात्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बैठकीतून अचानक उठून गेल्यानंतर नाना भानगिरे हे अजूनही नॉट रिचेबल आहेत.
