पुणे : अजित पवार गटाचे मंगलदास बांदल अडचणीत; एकाचवेळी सहा ठिकाणी ईडीची छापेमारी

पुणे : अजित पवार गटाचे मंगलदास बांदल अडचणीत; एकाचवेळी सहा ठिकाणी ईडीची छापेमारी

पुणे : जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्यासह तिघांवर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. एकाचवेळी एकूण सहा ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. ही छापेमारी नेमकी कोणत्या प्रकरणात झाली आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. बांदल हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत. (ED raided former chairman of health and construction department of Zilla Parishad Mangaldas Bandal)

बांदल यांच्यावर यापूर्वी शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 26 मे 2021 रोजी शिक्रापूर पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यानंतर त्यांच्याबाबतची अनेक प्रकरणे बाहेर आल्याने त्यांना तुरुंगात राहावे लागले होते. तब्बल एक वर्ष आणि आठ महिने ते तुरुंगातच होते. त्यानंतर जामीनावर ते बाहेर आले होते.

कोण आहेत मंगलदास बांदल?

पैलवान मंगलदास बांदल यांचे शिरूर हवेली परिसरात मोठे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्यांनी राजकीय सुरुवात केली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती राहिलेले आहेत. 2021 मध्ये अटक झाल्यानंंतर त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती.

धक्कादायक! शाळेत चिमुरडीवर अत्याचार; अंगावर काटा आणणारी घटना, पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई

बाहेर आल्यानंतर बांदल यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला होता. शिवाय शिरुरमधून उमेदवारीही मिळवली होती. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. शिवाय त्यांची उमेदवारीही रद्द केली होती.

पारनेरवर ठाकरेंचा वॉच! मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी

त्यानंतर बांदल यांनी अजित पवार गटात प्रवेश करत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. तसेच प्रचारसभाही घेतल्या होत्या. आता ते विधानसभा निवडणुकीमध्ये शिरुरमधून शरद पवार गटाचे आमदार अशोकबापू पवार यांच्याविरोधात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यासह तिघांवर ईडीने छापेमारी केल्याने ते अडचणीत आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube