भाजप प्रवेशापूर्वी पुरंदरचे माजी आमदार म्हणाले, ‘…तरी अजितदादांना झुकूनच अभिवादन करणार’
Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीत अशोक टेकवडे यांच्यावर अन्याय कोणाकडून झाला? बारामती मतदारसंघाचा (Baramati Constituency) 2024 चा खासदार कोण असणार? यासह विविध विषयावर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला.
तुमची नाराजी अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातली होती का? यावर टेकवडे म्हणाले की अजितदादा हे माझ्यासाठी कुटुंब प्रमुख होते. आमच्या पहिल्या भेटीपासून त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. अजितदादा मला कुठेही भेटले तरी मी त्यांना लवूनच अभिवादन करणार. पण मला ज्या पद्धतीने पक्षातील कार्यक्रमापासून बाजूला ठेवण्यात आले होते त्यावरुन माझ्या सहकार्यांनी सांगितले की आता बस झालं. 14 वर्ष वनवास सहन केला आहे. आतापर्यंत वाट बघत होतो की पक्ष काहीतरी जबाबदारी देईल पण काहीच दिले गेले नाही, अशी खंत अशोक टेकवडे यांनी व्यक्त केली.
जागा वाटपाच्या फॉर्मुल्याबाबत जयंत पाटलांचं मोठं विधान…
भाजपकडून काही शब्द किंवा आश्वासन देण्यात आले आहे का? यावर टेकवडे म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत 30 ते 35 मिनिटं चर्चा झाली. यावेळी त्यांनी तीन ते चार वेळेस मला आणि माझ्या मुलाला विचारले की तुम्हाला काही अपेक्षा आहे का? त्यावेळी आम्ही एका शब्दात सांगितले की आम्हाला काही अपेक्षा नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी तुम्ही मदत करा. त्यावेळी त्यांनी सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. आमचा प्रवेश अगोदरच ठरला होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की तुमचा प्रवेश जेपी नड्डा यांच्या हस्ते करायचा आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट
2024 ला बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील त्यावेळी त्यांच्या विरोधात प्रचार करणार का? यावर अशोक टेकवडे म्हणाले की 1967 पासून माझे वडील आबासाहेब टेकवडे हे पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहेत. मी अजितदादा यांच्या नेतृत्वात करत आलोय. माझी मुलगी ही सुप्रियाताई यांच्या नेतृत्वात काम करत होती. ऐवढा इतिहास असून देखील पक्षाचे माझ्याकडे दुर्लक्ष होतं. मी प्रमाणिकपणाने काम केलं. आम्ही ज्या पक्षात जाऊ त्यांच्यासोबत प्रमाणिकपणे काम करतो याची खात्री आल्यामुळेंच माझा भाजपात प्रवेश होताय. माझ्या वडिलांनी प्रमाणिकपणे काम केलं, मी देखील तेच केलं.
विखेंशी पंगा घेण्याचे अनेकजण टाळतात… पण राम शिंदे थेट भिडतात ! ही आहेत कारणे…
पुणे जिल्ह्यांची सगळी सुत्रं अजितदादा यांच्याकडे होती. सुप्रिया सुळे ह्या खासदार आहेत मग अन्याय कोणाकडून झाला? यावर बोलताना टेकवडे म्हणाले की पक्षात फक्त माझ्यावर अन्याय झाला नाही तर मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यावर झाला आहे. मी आता पक्ष सोडत असलो तर कोणाबद्दलही चुकीचे बोलणार नाही. कारण त्यावेळी ते आमचे श्रध्दास्थान होते.