मी देत आहे राष्ट्रवादीला शाप.. कारण निवडून येणार अश्विनी जगताप : रामदास आठवले
पिंपरी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कविता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे भाषणविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. आजही एका प्रचार सभेत कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करत आठवलेंनी टाळ्या मिळवल्या. मी देत आहे राष्ट्रवादीला शाप, कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप.., नरेंद्र मोदी आहे सगळ्यांचे बाप, मग का नाही येणार अश्विनी जगताप.., देवेंद्र आणि मी घेऊन आलोय जय भीमची काठी, कारण आम्ही दोघेही आहोत अश्विनीताईंच्या पाठी.., अशी कविता करत आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आठवले म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही इच्छा होती. अजित पवार म्हणाले होऊन जाऊ द्या, असे जर आहे तर आता होऊनच जाऊ द्या. प्रधानमंत्री बनण्यासाठी एका बाजूला अनेकजण इच्छुक आहेत. मी म्हणालो होतो, ‘जितनी बढानी है दाढी, पर राहुल गांधी की नही उनके जैशी बॉडी’. नरेंद्र मोदी हे 2024 ला प्रधानमंत्री होणारच आणि ते झाले की मी मंत्री होणारच असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
ते संविधान बदलतील कसे?
बाबासाहेब यांचे नाव घेणारे मोदी त्यांचे संविधान बदलतील कसे? संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे लोक आरोप करतात त्यात तथ्य नाही, असेही रामदास आठवले म्हणाले.
Aaditya Thackeray : खोक्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना जनता घरी पाठवणार!