Kasba Peth ByPoll : ३२ वर्षापूर्वीच्या इतिहासाची काँग्रेस पुनरावृत्ती करणार का?

Kasba Peth ByPoll : ३२ वर्षापूर्वीच्या इतिहासाची काँग्रेस पुनरावृत्ती करणार का?

पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Peth) मतदार संघात सन १९९१ मध्ये अण्णा जोशी (Anna Joshi) विजयी झाले होते. त्यानंतर पुढे त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली. तेव्हाही ते विजयी झाले. त्यानंतर पोटनिवडणूक लागल्याने भाजपने (BJP) तत्कालिन नगरसेवक आणि विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने (Congress) माजी महापौर वसंतराव थोरात यांना त्यांच्याविरोधात उभे केले होते. मात्र, त्यावेळी भाजपातील ५ नगरसेवक अचानक फुटले व काँग्रेसमध्ये गेले आणि नेमक्या याच कारणाने गिरीश बापट यांचा पराभव झाला व अण्णा थोरात विजयी झाले. मात्र, त्या पोटनिवडणुकीनंतर अजूनपर्यंत कसब्यात काँग्रेसला गुलाल उधळण्याची संधी साधता आलेली नाही.

कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. भाजपकडून हेमंतर रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात आहेत. रवींद्र धंगेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार देत काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या रुपात तगडा उमेदवार दिल्याने भाजपच्या हेमंत रासने यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक नव्हे तर दोन विधानसभा निवडणुकांमध्ये गिरीश बापट यांना पाळता भुई थोडी केली होती. त्यामुळे हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांचे तगडे आव्हान असणार आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात १९९५ पासून भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २०१९ साली गिरीश बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या कसब्याच्या आमदार झाल्या. या पोटनिवडणुकीच्या रूपाने काँग्रेसला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी चालून आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube