सियाचा नवा कारनामा, शॉपिंगसाठी 1 कोटी घेतले अन्… केतन हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
Ketan Agarwal Murder Case सिया गोयल आणि चेतन चौधरीने केतन अग्रवालची हत्या केल्यानंतर त्यांच्या भविष्याचा एक पक्का 'प्लॅन' तयार केला होता.
Ketan Agarwal Murder Case Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयलने होणारा पती केतन अग्रवाल याच्याकडून लग्नाच्या खरेदीच्या नावाखाली सुमारे 1 कोटी रुपये घेतले होते. मात्र, ही रक्कम लग्नाच्या तयारीवर खर्च न करता तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिल्याचा दावा केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी केतनच्या हत्येचा कट आधीच रचला होता. एवढेच नव्हे, तर गुन्ह्यानंतर लगेच लग्न न करता काही वर्षांनी विवाह करण्याचीही योजना दोघांनी आखली होती, जेणेकरून त्यांच्यावर संशय येणार नाही.
लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने घेतले 1 कोटी
पोलिस तपासातील माहितीनुसार, केतन अग्रवालने लग्नाच्या तयारीसाठी सिया गोयलला सुमारे 1 कोटी रुपये दिले होते. मात्र, लग्नासाठी खरेदी करण्याऐवजी सियाने ही संपूर्ण रक्कम तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, चेतनला त्याचा व्यवसाय आणि करिअर उभे करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे सियाने केतनकडून मिळालेली रक्कम त्याला दिल्याचा दावा केला जात आहे.
प्रियकराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न?
सूत्रांच्या माहितीनुसार, चेतन चौधरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील होता. आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी त्याला किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे त्याने सियाला सांगितले होते. त्यानंतर सियाने केतनकडून घेतलेली रक्कम चेतनला दिल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
हत्येनंतर तीन वर्षांनी लग्न करण्याचा प्लॅन
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केतनची हत्या झाल्यानंतर सिया आणि चेतन यांनी पुढील तीन वर्षे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात प्रकरणावरील संशय कमी होईल आणि त्यानंतर कुटुंबाच्या संमतीने विवाह करता येईल, अशी त्यांची योजना असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या
या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला पुण्यातील लोहगड किल्ल्यावर फिरायला नेले. तेथे संधी साधून त्याला खोल दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना १८ जून रोजी अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.