‘मावळ’मध्ये मोठा ट्विस्ट! उमेदवार न देता मविआचा चक्क अपक्षाला पाठिंबा; कारण काय?
Pune News : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे पुणे जिल्ह्यातील राजकारणात नवनवे ट्विस्ट येत आहेत. पुण्यातील मतदारसंघांतील लढतींचं चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. आताही एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने उमेदवार न देता चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने ही मोठी खेळी केली आहे. दरम्यान, या मतदारसंघात अजित पवार गटाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार न देता अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला आहे.
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; लंकेंच्या पारनेरात काशिनाथ दातेंना तिकीट
मावळ मतदारसंघातील महायुतीत आलबेल नाही अशी स्थिती आहे. या विसंवाद आणि नाराजीचा फायदा घेण्याचा प्लॅन विरोधकांना आखल्याचं दिसत आहे. तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत सुनील शेळके यांच्या उमेदवारीचा विरोध केला होता. त्यानंतर महायुतीतील दरी आणखी वाढली आहे.
या गोष्टी हेरून शरद पवार गटाने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयाने भेगडे यांचं बळ वाढलं आहे तर सुनील शेळके यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. महाविकास आघाडीने आता भेगडे यांना विजयी करण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात थेट लढत होणार आहे.
मावळातील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको? स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सवाल
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. आज महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यतील पारनेर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांना तिकीट मिळालं आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघात दिलीपकाका बनकर यांना संधी मिळाली आहे. फलटण मतदारसंघात सचिन पाटील तर बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.