2009 पासून मैदानात, यंदा लोकसभा लढवणारच; राष्ट्रवादीतून कोल्हेंविरोधात पहिला शड्डू!
Shirur News : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यातच आता शिरुर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढणार आहे.
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड, शिरुर, जुन्नर आमदार आणि आंबेगावचे आमदार माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत मतदारसंघात फ्लेक्स लावले आहेत. भोसरीत लावण्यात आलेल्या बॅनरवर तर त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यामुळे ते यावेळी निवडणूक लढण्यासाठी पूर्ण तयार असल्याचे संकेत मिळत आहे. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले, की मी 2019 मध्येच निवडणूक लढणार होतो. पण, काही कारणांमुळे माघार घेतली. आता लोकांचीच इच्छा आहे की मला संधी मिळेल. अमोल कोल्हे जर निवडणूक लढणार असतील तर मी त्यांना विरोध करणार नाही. तरीदेखील पक्ष घेईल तो निर्णय आणि जो उमेदवार देईल त्याचे काम करू असे लांडे म्हणाले.
पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय पवारांच्या कोर्टात; अनिल देशमुखांचा मोठा राजकीय बॉम्ब
यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विलास लांडे शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे माध्यमांतून समजले. प्रत्येकाला महत्वाकांक्षा असतात. तेव्हा लांडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण असे म्हणत त्यांनी या मतदारसंघाबाबतचा निर्णय शरद पवारच घेतील असे सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाने लोकसभेच्या 18 जागांवर दावा केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी दिसून आली. त्यानंतर आता राष्ट्रवादीतूनच एका नेत्याने दावा ठोकला आहे. त्यामुळे धुसफूस वाढल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. कोणताही पक्ष नाराज होणार नाही अशा पद्धतीने जागांचे वाटप करावे लागणार आहे. बंडखोरी उफाळून येणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणाला तिकीट मिळणार, कुणाचा पत्ता कट होणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Chandrasekhar Bawankule : ‘मी पंकजाताईंच भाषण ऐकलं, BJP माझ्या मागे असल्याचे त्यांनी म्हटलं’
कोल्हे की लांडे? जयंत पाटील म्हणतात अमोल कोल्हे उत्तम उमेदवार
राष्ट्रवादीत बरेच चांगले चेहरे इच्छुक आहेत. तरी काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवू. अमोल कोल्हे हे आमचे उत्तम उमेदवार आहेत. त्यांनी लोकसभेत चांगले काम केले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही चांगले उमेदवार शिरुर मतदारसंघात आहेत ज्यांचं तिथं चांगलं काम आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.