प्राध्यापकाला UPSC चा ध्यास, अपयशानंतर अंगावर थेट वर्दी; IPS संदीप गिल यांचा प्रेरणादायी प्रवास

प्राध्यापकाला UPSC चा ध्यास, अपयशानंतर अंगावर थेट वर्दी; IPS संदीप गिल यांचा प्रेरणादायी प्रवास

Career Success Story IPS Sandip Gill : उत्तर भारतातील पंजाब राज्यातील रहिवासी. शिक्षणही तिथंच झालं. चंदीगड महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली. करिअर सुरक्षित झालं. पण, युपीएससीचं स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं. नोकरी करत असतानाच युपीएससीसाठी नशीब आजमावलं. सुरुवातीला यश मिळालं नाही. तरी हार मानून प्रयत्न सोडले नाहीत. अखेर यशाला गवसणी घातलीच. पण,  पोस्टिंग मिळालं थेट महाराष्ट्रात. महाराष्ट्रातही माय मराठीच्या साथीनं कर्तुत्वाचा शिक्का उमटवला अन् आता महाराष्ट्राच्या पोलीस दलात ज्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं ते म्हणजे, पुण्याचे डीसीपी संदीप गिल.

पुण्यातील कोयता दहशत मोडून काढणं असो, अमली पदार्थांच्या व्यापाराचा बंदोबस्त करणं असो,  भडकलेल्या जमावाला तत्काळ शांत करण्याचं स्किल असो की राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचं यशस्वी नियोजन असो या सगळ्या अवघड वाटणाऱ्या  कामगिऱ्या संदीप गिलला यांनी लिलया साधल्या. एक प्राध्यापक ते यशस्वी आयपीएस अधिकारी हा प्रवास जाणून घेऊ या…

दिवाळीनिमित्त लेट्सअप मराठीने संदीप गिल यांचा यशस्वी प्रवास जाणून घेतला. त्यांनी मिळवलेलं यश, शिक्षण, करिअरचे मार्ग यावर डीसीपी गिल यांनी प्रवास उलगडून सांगितला.

प्राध्यापक होतो पण ध्येय युपीएससी

संदीप गिल हे मुळचे लुधियाना (पंजाब) जिल्ह्यातील खन्ना या गावचे रहिवासी. या ठिकाणीच बालपण गेले. शिक्षणही याच शहरात पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात झाले. येथे एमए इंग्लिश पूर्ण केले. नंतर येथे काही वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. याच काळात युपीएससीचा अभ्यास करत परीक्षाही देत होते.

साहित्याची आवड, एमए इंग्लिश पू्र्ण 

संदीप गिल यांना साहित्यात आवड होती. पोस्ट ग्रॅज्यूएशन करणार होतो. पण, पोस्ट ग्रॅज्यूएशन केल्यानंतर पुढं काय हा प्रश्न होताच. पण जर इंग्रजीत अभ्यास केला तर भविष्यात फायदा होईल याचा विचार करून एमए इंग्लिश करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी भाषेत साहित्याचा अभ्यास केला. युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय अचानक झाला नाही. माझं ते आधीपासूनचच उद्दीष्ट होतं. सुरुवातीला प्रयत्न केले पण त्यावेळी यश काही मिळालं नाही. त्यावेळी माझं शिक्षणही सुरू होतं. पण नंतर यश मिळालं, असे गिल यांनी सांगितले.

सुरुवातीला फेल पण, कष्ट करून यश मिळवलंच 

सुरुवातीला युपीएससीच्या परीक्षा दिल्या पण यश  काही मिळालं नाही. यश मिळालं नाही म्हणून स्वस्थ बसलो नाही. प्रयत्न करत राहिलो. परीक्षा देत राहिलो. नियोजनपूर्वक अभ्यास केला. नंतर मात्र यश मिळालं. ज्यावेळी तुम्ही करिअरसाठी धावपळ करता. शाळेत आणि महाविद्यालयात असताना विविध पर्याय तुमच्यासमोर असतात. तुमचं आधीचं शिक्षण कसं झालं आहे ही गोष्ट तुमच्या भविष्यातील संधींवर परिणाम करतात. तुम्ही पुढे कोणत्या क्षेत्रात जाऊ शकता हे देखील त्यावरूनच ठरतं. यावेळी तुम्ही तुमच्याकडील पर्यायांचा विचार करून तुमची क्षमता पाहून करिअरची निवड करता. या पद्धतीने माझ्या यादीत युपीएससी होतं. मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि मला यश मिळालं.

असं जुळलं मराठीशी नातं 

मी येथे आलो. त्यावेळी डोक्यात विचार होता की ज्याठिकाणी आपण काम करणार आहोत तेथील भाषेची आपल्याला जाण नाही. महाराष्ट्र तर आता माझी कर्मभूमी झाली आहे. येथील कल्चर आणि सामाजिक गोष्टींची माहिती घेण्यासाठी पहिले म्हणजे तेथील भाषेची तुम्हाला चांगली माहिती असली पाहिजे. ज्यावेळी मिरजमध्ये होतो. त्यावेळी मी माझ्या स्टाफला माझ्याशी मराठीतच बोलण्याचे बंधनकारक केले होते. तसेच मी कुठेही हिंदीत बोलत असलो तरी त्यात किमान दहा टक्के तरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यात हळूहळू वाढ केली. त्यामुळे मराठी भाषा चांगली अवगत केल्याचे गिल म्हणाले.

चंदीगड महाविद्यालयात मी प्राध्यापक होतो. महाराष्ट्रात करिअरची सुरुवात नांदेडपासून झाली. नांदेडमध्ये प्रशिक्षणार्थी अतिरिक्त पोलीस अधीक्षक होतो. त्यानंतर परभणीत नियमित पोस्टिंग मिळाली. त्यानंतर मिरजला बदली झाली. येथे जवळपास दोन वर्ष एसपी म्हणून काम केले. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांचाही काही काळासाठी कार्यभार होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube