आता पुण्यातून नाशिक गाठा दोन तासांत; आमदार लांडगेंनी दिली महत्वाची अपडेट
Pune Nashik Express Way : पुणे आणि नाशिककरांसाठी गुडन्यूज मिळाली आहे. पुणे ते नाशिकचा कंटाळवाणा प्रवास आता सुपरफास्ट आणि अत्यंत सोपा होणार आहे. नाशिक-पुणे एक्सप्रेस महामार्गासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून हा डीपीआर येत्या 8 ते 10 महिन्यात तयार होईल, अशी माहिती भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
या मार्गासाठी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर मोनार्क सर्वेअर्स अँड इंजिनिअरींग कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेडने अॅक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेसाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू केले आहे. साधारण आठ ते दहा महिन्यात हे काम पूर्ण होईल.
https://twitter.com/maheshklandge/status/1679443577548713984
साधारण 180 किलोमीटरच्या सहा पदरी असणाऱ्या या नाशिक पुणे एक्सप्रेस मार्गामुळे प्रवास अत्यंत कमी वेळात होईल. सध्या पुण्यावरून नाशिकला जाण्यासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागतो. दोन्ही शहरांतील अंतर 215 किलोमीटर आहे. एक्सप्रेस वे चे काम पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर फक्त दोन तासात पूर्ण करता येईल. हा महामार्ग एमएसआरडीसीच्या प्रस्तावित पुणे रिंग रोड प्रकल्पालाही जोडणार आहे. हा एक्सप्रेस वे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे.
दरम्यान, पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे कामही वेगाने होत आहे. त्यामुळे हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. येथील काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच वाहतुकही सुरू होईल.