Pune Loksabha Bypoll : राष्ट्रवादीतही रस्सीखेच ! शरद पवारांच्या मर्जीतल्या ‘या’ नेत्याने लावली फिल्डींग
Pune Lok Sabha By Poll : पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी कोण असा प्रश्न आहे. या ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक (Pune Lok Sabha By Poll) लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मागील काही दिवसांत तर पुण्यात अनेकांचे भावी खासदार म्हणून बॅनरही झळकले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर शहरात ठिकठिकाणी दिसत होते.
जगताप यांनी आपण ही पोटनिवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जवळचे मानले जाणारे दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी देखील या जागेवर दावा केला आहे.
Pune Loksabha : मेधा कुलकर्णी यांनाही व्हायचंय खासदार; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष
या ठिकाणी दांडगा जनसंपर्क, कोरोना काळात केलेली कामे, युवकांचे सोडवलेले अनेक प्रश्न या मानकर यांच्या जमेच्या बाजू आहेत. 35 वर्षे पुण्यात लोकांसाठी काम केल्यानंतर कार्यकर्त्यानी आग्रह केला. त्यामुळे या पोटनिवडणुकीत त्यांची भावना जपण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मानकर यांनी सांगितले. ही जागा काँग्रेसकडे असली तरी कसबा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण पाहता ही जागा राष्ट्रवादीही मागू शकते.
भाजपलाही टेन्शन
भाजपमध्येही या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये काही नावे आघाडीवर असून त्यामुळे तिकीट कुणाला द्यायचे, असा मोठा प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर उभा राहिला आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार संजय काकडे, स्वरदा बापट, जगदीश मुळीक ही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या जागेसाठी भाजपमध्येही मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रशांत जगताप, दीपक मानकर यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे योग्य उमेदवाराची निवड करताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे आताच दिसत आहे.
दरम्यान, गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची जाहीर इच्छा व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये बापट यांच्या निधनानंतर काहीच दिवसानंतर पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते. या प्रकारावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. त्यानंतर मुळीक यांना या वादावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते.