‘हळदीची शेती पाहिली अन् अंगरक्षकाला विचारलं तुझी जखम बरी आहे का?’ पीए राऊतांनी सांगितला पवारांचा ‘तो’ प्रसंग
Sharad Pawar : देशाच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांचा विचार होतो तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव आघाडीवर असते. पण, फक्त राजकारणच नाही तर राजकारणाच्या पलीकडेही शरद पवार यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या सुख दुःखात ते नेहमीच सहभागी होतात. त्यांची आस्थेने विचारपूस करतात. याचा अनुभव नुकताच आला. हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान एके ठिकाणी हळदीची शेती पाहताना त्यांना आपल्या अंगरक्षकाच्या जखमेची आठवण झाली. हा प्रसंग शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांनी शब्दबद्ध केला आहे.
राऊत यांनी शरद पवार यांच्या सोलापूर ते कागल दौऱ्याबद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या प्रसंगाची माहिती दिली आहे.
राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, साहेबांचा हा दौरा प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला पुढे कागल, निपाणी असा होता. 8 मे हा जिल्ह्यातील दौऱ्याचा दुसरा दिवस उहोता. दुपारी बाराच्या सुमारास आम्ही सांगोल्यातील बाबूराव गायकवाड यांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने कागलच्या दिशेने निघालो. सांगोला, शिरढोण, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, कागल असा तो प्रवास असणार होता.
शरद पवार ‘असे’ उभे राहिले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी; स्वतःच सांगितला किस्सा..
आम्ही सांगली जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. कवठे महाकाळ तासगावच्या परिसरात शेतमळ्यावर द्राक्षांचे घड सुकविण्यासाठी उभारलेले आच्छादनाखालचे शेड पाहिले. त्यानंतर पुढे कृष्णाकाठ लागेपर्यंत मिरजेच्या परिसरात पोयटा मातीच्या ढिगाऱ्यांवर पिवळ्या प्लास्टिक अथवा ताडपत्रीसारखी आच्छादनं दिसत होती. ही हळदीची शेती असल्याचे साहेबांनी सांगितले. उंचावरून स्पष्ट दिसत नव्हतं पण ते लागवडीसाठी तयार असलेले हळदीचे ढीग असावेत असे मी अनुमान काढले.
साहेब म्हणाले, राज्यात हळदीचे जास्त उत्पादन याच भागात होतं. हळद बहुगुणी पीक. जखमेवर, सूजेवर हळद चोळली की ती जखम भरून निघते. सूज कमी होते. हळदीचा विषय रंगत असतानाच त्यांची नजर समोर अंग चोरून बसलेल्या पीएसओ बाबर यांच्या हाताकडे गेली. हाताला लागलेलं बरं झालं का ? असं त्यांनी विचारलं. बाबर गोंधळात पडले. साहेब कोपरापासून मनगटाकडे काय बघतात हे त्यांना समजेना. मी म्हटले, लोणावळा घाटात सुमो पलटी होऊन तुमच्या हाताला लागले होते. साहेब ते पाहतायेत. त्यानंतर बाबर जखम बरी झाल्याचे दाखवू लागले.
Pune BJP State Executive Meeting : फडणवीसांचे ज्येष्ठांना टोले की पंकजा मुंडेंना सुनावले !
वर्षभरापूर्वी पुणे-मुंबई प्रवासा दरम्यान लोणावळा घाटात वळणावर गाडी पलटी झाली. अपघातासारखी घटना डोळ्यांदेखत घडली तरी साहेब शांत राहतात. पण त्यांच्या मनात त्या घटनेचे पडसाद उमटलेले असतात.
ते पुढे म्हणतात, पहा ना घाटातल्या अपघातात बाबरांच्या हाताला झालेली जखम पूर्ण बरी झाली तरी साहेबांच्या मनातून ती सुकली नव्हती. साहेबांनी विचारपूस केल्याने ती घटना जिवंत झाली होती. धान्य असो वा बेदाणा तो सुकला की आधिककाळ टिकतो हे शेतीचं सूत्र आहे पण आठवण ओली असली की ती खूप दिवस टिकते हे साहेबांचं सूत्र मी पाणावलेला कृष्णाकाठ पाहता पाहता टिपत होतो.