पहाटेच्या शपथविधीवरील प्रतिक्रियेनंतर आमदार Anna Bansode फोनच उचलेनात…
पिंपरी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तू तू मै मै चालू असताना शरद पवार यांनी याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे याला आणखीनच हवा मिळाली.
दरम्यान, या शपथविधीचे साक्षीदार असलेले पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही यावर प्रतिक्रिया देऊन टाकली अन या घटनेचा साक्षीदार असल्याचे समाधानही व्यक्त केल. मात्र, या प्रतिक्रियेनंतर ते फोन उचलत नसून यावर पुन्हा प्रतिक्रिया देण्याचं टाळतांना दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिंचवड येथील पत्रकार परिषदेमध्ये पहाटेच्या शपथविधीबद्दल महत्वपूर्ण विधान केले. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, असं वक्तव्य करून त्यांनी हा शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीच होता, असा अप्रत्यक्ष खुलासा केला.
त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपकडून पवारांवर जोरदार टीका करण्यात येत असतानाच या शपथविधीचे साक्षीदार असलेले आमदार बनसोडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांनी मला फोन केला आणि मी लगेचच मुंबईला पोहोचलो त्यानंतर फडणवीस आणि अजितदादांचा माझ्यासमोरच शपथविधी झाला. त्यावेळी राष्ट्रवादीचे 12 आमदारही उपस्थित असल्याचा खुलासा केला.
बनसोडे पुढे म्हणाले, माझा अजितदादांवर विश्वास होता. मी त्यांचा कट्टर समर्थक आहे. त्यामुळे दादा म्हणतील ते मी करायला तयार होतो. मी पवार साहेबांना भेटायलाही सर्वात शेवटी गेलो होतो. मात्र, नुकतच पवार साहेबांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल केलेल्या खुलाशानंतर आपण जे केलं त्याचं समाधान वाटत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, यानंतर अण्णा बनसोडे फोन घेत नाहीत. याबाबत लेट्सअप मराठीच्या प्रतिनिधीने त्यांना फोन केले. मात्र, त्यांनी ते उचलले नाहीत. दरम्यान, आज एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आपण केलेलं वक्तव्य चेष्टेत केलं होतं असं म्हटलं आहे. मात्र, पवारांनी केलेल्या आधीच्या वक्तव्यानंतर बनसोडेंनी जे काही घडलं ते खरं खरं सांगून टाकलं. मात्र, आता त्यांची पंचायत झालेली दिसतेय. त्यामुळेच तर बनसोडे फोन उचलत नाहीयेत ना?, असा सवाल उपस्थित झाला आहे.
Devendra Fadnavis हे Sharad Pawar यांना आवडत नाहीत? वाचा पवार काय म्हणाले
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा गेल्या सुमारे साडेतीन वर्षांपासून राज्यात वेळोवेळी होत आली आहे. मात्र, यावर खुलेपणाने भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही कडूनही खुलासा करण्यात येत नव्हता. काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी हा शपथविधी शरद पवार यांच्या सहमतीने झाला होता, असे सांगत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर पवारांनी हा शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी झाला होता, असं अप्रत्यक्षरीत्या बोलून गेले. यानंतर आज आपण केलेले वक्तव्य हे चेष्टेत केलं होतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.