Hemant Rasane यांच्या विजयासाठी मनसे शेवटच्या क्षणी मैदानात; राज ठाकरेंचे आदेश !
पुणे : हिंदुत्वाच्या भूमिकेकरिता कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये (Kasba Elections) भारतीय जनता पक्षाबरोबर पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पुण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री दिले.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर गेल्या २ दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. आता मतदान होईपर्यंत ते पुण्यातमध्येच थांबणार आहेत. पुढील २ दिवसात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या मतदानाकरिता भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. यानुसार पक्षाचा प्रत्येक सैनिक भाजपाचे उमेदवार रासने यांच्यासाठी काम करणार आहे, असे नांदगावकर यांनी यावेळी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी प्रचार संपल्यावर रात्री उशिरा या संदर्भात आदेश सर्व पुण्यातील मनसैनिकांना देण्यात आले आहेत. वास्तविक या निवडणुकीमध्ये मनसे थेट निवडणुकीच्या प्रचारात उतरणार नव्हती. केवळ भाजपला पाठिंबा देणार होती. यानुसार आज प्रचाराची सांगता झाली. प्रचारात मनसे कुठेही सक्रिय नव्हती. मात्र, यानंतर मनसेच्यावतीने भाजपासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.
Mangaldas Bandal तब्ब्ल २२ महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर… म्हटले एक डाव भुताचा… दुसरा डाव देवाचा!
या मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत शिंदे यांना सुमारे ८हजार ५०० मते मिळाली होती. त्यानंतर मनसेत रूपाली ठोंबरे पाटील यांच्या रूपाने फूट पडली. मनसेची ताकद काहीशी कमी झाली असली तरी मनसेला मानणारा तरुण वर्ग मोठ्या संख्येने पक्षात आज देखील सक्रिय आहे. यामुळे मनसेच्या या सक्रियतेचा भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना फायदा होणार आहे.