CM पदासाठी भाजपाचं धक्कातंत्र? मुरलीधर मोहोळांच्या नावाची चर्चा, मोहोळांनीही क्लिअरच केलं..

CM पदासाठी भाजपाचं धक्कातंत्र? मुरलीधर मोहोळांच्या नावाची चर्चा, मोहोळांनीही क्लिअरच केलं..

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे अधोरेखित झालं आहे. मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे यांनी गुगली टाकत त्यांच्या गावी निघून गेले आहेत. यातच आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी अचानक पुढे आलं आहे. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या चर्चांवर स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट लिहित या सर्व चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

मोहोळ यांनी भाजपमधून राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांनी विविध पदं सांभाळली. मोहोळ पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच महापौर राहिले आहेत.  मोहोळ यांचं कुटुंब कुस्ती क्षेत्राशी निगडीत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी शिक्षणाबरोबरच कु्स्तीचेही धडे गिरवले. त्यांचे आजोबा, वडील, काका आणि मोठे बंधू पैलवान आहेत.

पुण्यात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुस्तीची कला शिकण्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठलं. कोल्हापुरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोहोळ पुण्यात आले. यानंतर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांनी 1993 च्या काळात राजकारणात प्रवेश केला. याच काळात मोहोळ माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संपर्कात आले. यानंतर त्यांचा राजकारणात दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली.

Pune News : पुण्याचे महापौर ते केंद्रीय मंत्री.. दोन वर्षात मोहोळांची गरुडझेप

नेमकं काय म्हणाले मोहोळ ?

समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube