Nana Patole : काटे-धंगेकरांना मेरिटमध्ये आणा; नाना पटोले यांचे चिंचवडमध्ये आवाहन

Nana Patole : काटे-धंगेकरांना मेरिटमध्ये आणा; नाना पटोले यांचे चिंचवडमध्ये आवाहन

पुणे – पिंपरी चिंचवडच्या (Pimpari Chinchwad Bypoll) विकासात महाविकास आघाडीचे मोठे योगदान आहे. कसबा पेठेत रवींद्र धंगेकर जसे जनतेचे उमेदवार झाले तसे चिंचवडमध्येही नाना काटे जनतेचे उमेदवार होण्याची गरज आहे. त्या पद्धतीचे वातावरण येथे तयार करण्याची गरज आहे. नाना काटे आणि रवींद्र धंगेकर हे दोन्ही उमेदवार निवडणुकीत नुसते पास होऊन चालणार नाही तर हे दोघे मेरिटमध्ये पास झाले पाहिजेत, असे आवाहन काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पिंपरी चिंचवड येथे सोमवारी जाहीर सभेत केले. पिंपरी चिंचवड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते.

पटोले यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की काँग्रेस खासदार राहुल गांधी सर्वांना एकत्र आणत आहेत. देशातील जनतेला धीर देण्याचे काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली. तर दुसरीकडे मोदी देशातील संपत्ती विकून देश चालवित आहेत. महागाई वाढविण्याचे पाप करत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि मोदी यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहराला चांगले बनविण्याचे काम शहराच्या विकासात महाविकास आघाडीचे (MVA) मोठे योगदान आहे. मात्र येथे भाजपला सत्ता दिली. त्यांचा गावातला कार्यकर्ता सुद्धा भ्रष्टाचार करतो. जीएसटी सारखा कायदा आणून तुमच्या घामाचा कष्टाचा पैसा केंद्राच्या तिजोरीत न्यायचा. त्यातून त्यांच्या मूठभर मित्रांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ करायचे. त्यांचे दिल्लीतील आका लोक भ्रष्टाचार करत आहेत. तुमचे पैसे नेऊन मूठभर लोकांच्या घशात टाकले जातात. आणि तुम्हाला गरीब केलं जाते. नाना काटे निवडून येणे म्हणजे या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात हे मतदान होणार आहे. कसब्यात धंगेकर जनतेचे उमेदवार झाले तसे नाना काटे सुद्धा जनतेचे उमेदवार होण्याची गरज आहे. त्या पद्धतीचे वातावरण येथे निर्माण करण्याची गरज असल्याचे पटोले म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला पण विश्वासघात करून या लोकांनी दिल्लीतील महाशक्तीच्या जोरावर सरकार पाडले. ही महाशक्ती 19 तारखेला पिंपरी व कसब्याच्या निवडणुकीसाठी येथे येत असल्याचे सांगितले जात आहे. ही तुम्हाला संधी आहे. आता महाविकास आघाडीची शक्ती काय आहे हे दाखवून देण्याची संधी तुम्हाला आहे. त्यांना त्यांची जागा दाखविण्याची संधी आता आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube