पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना दिले महत्वाचे आदेश

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कठोर कारवाईचे आदेश दिले.

News Photo   2026 05 23T175850.714

राष्ट्रीय महिला आयोगाने, महाराष्ट्रातील (Pune) पुणे येथे एका महिलेवर कथित ॲसिड हल्ला आणि तिच्यावर झालेला अत्यंत क्रूर घरगुती छळ यांबाबत प्रसारमाध्यमांत आलेल्या अत्यंत चिंताजनक वृत्तांची स्वतःहून दखल घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२० एप्रिलला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती हे दारू पिऊन घरी आले.”तू कामावर जातेस,तुझे कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग,”असे म्हणत त्यांनी पत्नीला मारहाणीस सुरुवात केली.नराधम पती एवढ्यावरच थांबला नाही,तर”तुला मुलगा होत नाही,तुझी अवघड जागाच जाळून टाकतो”अशी धमकी त्याने दिली.

मुलांसमोरच दिराचा जबरदस्तीने वहिनीवर अत्याचार; पीडितेने केला अ‍ॅसिडने हल्ला

त्यानंतर पोटमाळ्यावरून टॉयलेट साफ करण्याची ॲसिडची बाटली काढून,त्याने पत्नीला जोरात खाली ढकलले आणि त्यांच्या गुप्तांगावर थेट ॲसिड ओतले.पीडितेने जीवाच्या आकांताने ओरडत बाहेर पळण्याचा प्रयत्न केला,मात्र आरोपीने दरवाजा आतून लावून घेत पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.शेजारी राहणाऱ्या जावेने पीडितेच्या सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले,तेव्हा “कोणाला काही सांगितले तर जिवे मारीन,”अशी धमकी देत पती घरातून पळून गेला.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, या प्रकरणी तात्काळ, कठोर आणि कालमर्यादेत (वेळेच्या चौकटीत) कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने या संदर्भात सात दिवसांच्या आत ‘केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल’ सादर करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी नोंदवण्यात आलेला एफ.आय.आर. ‘भारतीय न्याय संहिता’अंतर्गत लागू करण्यात आलेली कलमे, तपासाची सद्यस्थिती, आरोपीची अटक व पोलीस कोठडीतील चौकशी, पीडितेचे वैद्यकीय उपचार व न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी, गुन्ह्यात वापरलेल्या रासायनिक पदार्थाची जप्ती, तसंच पीडितेची सुरक्षा, संरक्षण आणि पुनर्वसन यांसाठी उचललेली पावले या सर्व बाबींवर आधारित सविस्तर अहवाल आयोगाने मागवला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, ॲसिड हल्ले, घरगुती छळ आणि महिलांवरील हिंसाचार यांसारखे गुन्हे हे अत्यंत घृणास्पद स्वरूपाचे असतात आणि अशा गुन्ह्यांबाबत कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई होणे अनिवार्य आहे, असं आयोगाने स्पष्ट केले आहे.

follow us