Pune News : कोश्यारी राज्याबाहेर गेले; राष्ट्रवादीने वाटले पेढे..

Pune News : कोश्यारी राज्याबाहेर गेले; राष्ट्रवादीने वाटले पेढे..

पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर रविवारी दिवसभरात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी पेढे वाटून कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. “एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना (Governor) महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. राज्यातील महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. आज त्यांना हटविण्याचा आनंद राज्यातील सर्वच जनतेला झाला आहे.जर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला महापुरुषांबद्दल अस्मिता असती तर त्यांनी वेळीच राज्यपालांची हकालपट्टी केली असती आणि आजचा हा जल्लोष अधिक मोठा करता आला असता मात्र त्यांनी तसे केले नाही, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला अक्षरशः पायदळी तुडविल्यानंतर अखेर आज कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर त्यांना पदावरून हटविले आहे, हे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपणच आहे”, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले. याप्रसंगी प्रशांत जगताप, मा.नगरसेविका प्रियाताई गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, विपुल म्हैसुरकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी कोश्यारी वादग्रस्त ठरले होते. कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात वादंग उठले होते. विरोधी पक्षांनी आंदोलने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यानंतर आता रमेश बैस राज्याचे राज्यपालपदी विराजमान झाले आहेत. रमेश बैस याआधी झारखंडचे (Jharkhadnd) राज्यपाल होते. तेथेही राज्य सरकार आणि बैस यांच्यात मतभेद होते. त्यामुळे आता त्यांच्या कार्यकाळात तसाच संघर्ष राज्यात पहायला मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube