Video : “पोपट, मैना अन् मोर… : ‘मविआ’च्या मारलेल्या पक्षांना जिवंत करत अजितदादांची फटकेबाजी
पुणे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘पोपट’मेला की जिवंत आहे यावरून चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. पोपट मेला असे वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याला विरोधकांकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. अशात आता या वादात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आज (१९ मे) पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. (NCP Leader Ajit Pawar critisized DCM devendra fadnavis on MLA controversy)
काय म्हणाले अजित पवार?
आहो, पोपट मेलेला दाखवा तरी, कुठं मेलाय. उगीच उपमुख्यमंत्र्यांनी म्हणायचं, पोपट मेलाय, आम्ही म्हणायचं मैना मेलीय आणखी कोणी म्हणायचं मोर मेलाय. काही मेलेलं नाही. सगळं जनतेच्या समोर आहे. जनता जनार्दन सर्वस्व आहे. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. काँग्रेस पण संपणार नाही, असं म्हणायचं. पण काँग्रेसही पराभूत झाली. देशाने अनेक चढ-उतार बघितले आहेत. शेवटी जे जनतेच्या मनात असते तेच होते. त्यामुळे कोणी पोपट मेला, मैना मेली म्हणायचं कारण नाही.
Ajit Pawar: "पोपट, मैना अन् मोर… : 'मविआ'च्या मारलेल्या पक्षांना जिवंत करत अजितदादांची फटकेबाजी#AjitPawar #NCP #PuneNews #PunePolitics @AjitPawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/SVCzqIB3L3
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 19, 2023
पोपट प्रकरण नेमकं आहे तरी काय?
राज्यातील पोपट प्रकरणाची सुरुवात शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली होती. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर बोलताना ठाकरे म्हणाले, पोपट हलत नाही, निश्चल आहे. त्याने डोळे मिटलेले आहेत. चोच उघडत नाही. श्वासही घेत नाहीये. हे वर्णन करून पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवलं आहे.
ठाकरे यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला आधीच तडे गेलेले आहेत. कोणी कसे बसायचे, कुठे उभे राहायचे, कोणी बोलायचे यावरून वाद सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुरते कळले आहे की, आपला पोपट मेलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पोपट जिवंत आहे, तो मान हलवतो आहे, त्याचे हातपाय हलताहेत हे दाखवावे लागते.
मुंबईतील भाजप बैठकीनंतर बोलताना पुन्हा एकदा फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे राजा महाराजापेक्षा कमी नाहीत. एका राजाला एक पोपट आवडत होता. पोपट मेला त्यानंतर राजाला सांगेल कोण हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावेळी राजाला जो सांगेन त्याचा शिरच्छेद होणार होता. त्यानंतर पोपटाची विचारपूस सुरु होती, अगदी तशीच यांचीही अवस्था झाली आहे. त्यांना माहितीये पोपट मेलाय तरीही सांगतात 16 आमदार रद्द होणार आहे.
फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर :
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी प्रत्तुत्तर दिले होते. ते म्हणाले होते, या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणून असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत. पण देवेंद्र फडणवीसच जर असं बोलायला लागले असतील तर शहाणपणाच्या व्याख्याच बदलाव्या लागतील. त्यांना वकिलींच चांगल ज्ञान आहे, त्यांना कायदा कळतो, त्यांना प्रशासन कळतं, त्यांना राजकारण माहितीये, त्यांना पडद्यामागे काय चाललंय ते माहितये, ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. तरी ते अशी वक्तव्ये करतात यावरुन त्यांची काहीतरी मजबुरी दिसते, असे राऊत म्हणाले होते.
पुण्यातील बैठकीत पुन्हा एकदा फडणवीस यांनी ठाकरेंना डिवचलं. ते म्हणाले, राजाचा आवडता पोपट मेला हे कोणी सांगायला तयार होत नाही. शिल्लकसेनेने सर्वोच्च न्यायालयात एकूण आठ मागण्या ठेवल्या होत्या. मात्र, त्यातली एकही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पोपट आता मेला असून हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आणि संविधानिक असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.