पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; शरद पवार असणार प्रमुख पाहुणे

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 10T174415.553

PM Modi at Pune :  लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर करण्यात आला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषद त्याची माहिती दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल दीपक टिळक यांनी सांगितले. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

अजितदादांच्या विरोधात कोण उभं राहणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची 103वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार असून या पुरस्काराचे यंदाचे 41वे वर्ष आहे.

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींनंतर या कार्यक्रमाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष पहायला मिळत आहे. अजित पवारांच्या या निर्णयानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काका-पुतणे येणार एकाच मंचावर; PM मोदी, CM शिंदेंच्या उपस्थितीत होणार भेट

दरम्यान, या कार्यक्रमात मोदींनी यावे यासाठी खास शरद पवारांनी प्रयत्न केले होते. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत शरद पवारांनी याची माहिती दिली होती. रोहित टिळक यांना मोदींपर्यंत अॅक्सेस नव्हता. मात्र, रोहित टिळकांनी शरद पवारांना विनंती केल्याने मोदींनी या कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले.

Tags

follow us