लोकशाहीत चांगल्या नेतृत्वासाठी व्यावहारिक शिक्षण गरजेचे , खासदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल

Radha Mohan Das Agarwal :  "व्यावहारिक शिक्षण पद्धती आवश्यक असून त्यामधूनच लोकशाहीत चांगले नेतृत्व उदयास येते. राजकारणात पाऊल

Radha Mohan Das Agarwal

Radha Mohan Das Agarwal :  “व्यावहारिक शिक्षण पद्धती आवश्यक असून त्यामधूनच लोकशाहीत चांगले नेतृत्व उदयास येते. राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तत्पर असावे. मिटसॉगच्या विद्यार्थ्यांनी व्यावहारिक शिक्षणाबरोबरच स्थानिक निवडणुकीत उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी,” असा सल्ला राज्यसभा खासदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल यांनी दिला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नमेंट (एमपीएलजी) च्या २२ व्या बॅचच्या दीक्षारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मिटसॉगचे माजी विद्यार्थी व आमदार सुमित वानखेडे, आमदार हेमंत ओगले व आंध्रप्रदेशचे राज्यसभा खासदार विजय चिंताकायल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविराजा सिताराम, मिटसॉगचे संचालक डॉ. नमेश किलेमशेट्टी, संकल्प संघई व डॉ. गोपाळ वामणे उपस्थित होते.

डॉ. राधा मोहनदास अग्रवाल म्हणाले, “राजकारणात पैशांची गरज नसते, तर पैसेवाले राजकारणाला आपल्या मुठीत बंद करू पाहत आहेत. त्यासाठी ही विचारधारा बदलणे गरजेचे आहे. जनतेची समस्या ओळखणारा खरा नेता असतो. राजकारणात व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर करुणानिधी, जयललिता, ज्ञानी झैलसिंग यांसारख्या अनेक नेत्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारणात हरणारा व्यक्ती स्वतःच जबाबदार असतो. त्यासाठी उत्कृष्ट वक्ता बना.”

विजय चिंताकायल म्हणाले, “ज्ञानाशिवाय प्रगती होत नाही. डॉ. राहुल कराड यांनी २२ वर्षांपूर्वी सुरू केलेला मिटसॉग संपूर्ण देशाचे भविष्य निश्चित करेल व राजकारणाची दिशा बदलेल. राष्ट्र उभारणीसाठी लोकशाहीला समर्पित नेत्यांची गरज आहे.” डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. राजकारणी मंडळींनी प्रशिक्षण घेतले तर देशाचे प्रशासन व लोकशाही सुधारण्यास वेळ लागणार नाही. देशातील वेगवेगळ्या राज्यात एसओजीचे मॉडेल सुरू आहे. भारत सरकार व राज्य सरकारांनी यूथ पार्लमेंट सुरू केले आहे. तसेच ६ विधानसभांशी आमचे सामंजस्य करार (MoU) झाले आहेत.”

सुमित वानखेडे म्हणाले,”विचारांना सत्यात परिवर्तित करण्याचे कार्य डॉ. राहुल कराड यांनी केले आहे. ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील आव्हानांना समजून घ्या. समाज, देश आणि लोकांची भावना समजून चांगल्या कामासाठी राजकारण करावे. प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करून मूल्यांच्या आधारे राजकारण करावे.” हेमंत ओगले म्हणाले, “राजकारणात व्यावहारिक भूमिकांना अत्यंत महत्त्व आहे. चांगल्या राजकीय लोकांचा वारसा घेऊन सामाजिक व राजकीय कार्य करावे. परंतु या क्षेत्रात प्रचंड संयम ठेवून आपली कार्यदिशा ठरवावी लागते.”

डॉ. रविराज सिताराम म्हणाले, “देशाला उत्तम प्रशासनाची गरज असून ती गरज लोकशाहीला चांगली दिशा देण्याचे कार्य एसओजीच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. या प्रयत्नामुळे राजकारणाचा चेहरा बदलेल.” डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी ऑनलाइन संदेशात सांगितले की, टी. एन. शेषन यांच्या मार्गदर्शनात डॉ. राहुल कराड यांनी हे स्कूल सुरू केले आहे.

यावेळी एसओजीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एसओजीचे विद्यार्थी अंशुल वर्मा व मोहम्मद नाजीश यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक डॉ. नमेश किलेमशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन प्रगती पटेल व अनुष्का गावंडे यांनी केले तर आभार प्रा. गोपाळ वामणे यांनी मानले.

एसओजीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय राजकारणाला दिली नवी दिशा

राजकारणाचे प्रशिक्षण देणारी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली संस्था एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आहे. या स्कूलच्या माध्यमातून देशपातळीवरील वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये राजकीय नेतृत्वात भरीव योगदान देणारे विजय चिंताकायल, हेमंत ओगले, सुमित वानखेडे, प्रिया तायडे, प्रियंका मेदणकर, सिद्धेश नाईक, स्नेहिल देसाई, पंकज चंडेल, प्रसाद सानप, अभिजित मोरे, विधी पळसापुरे, निधी कामदार, रजत जसूजा, विक्रम गुणकर, संध्या सोनावणे, रविराज खाडे, मृणाल ढोले पाटील हे विद्यार्थी आहेत.

follow us