पुण्यनगरी विद्वत्तेची दुसरी ओळख; इथे सन्मान झाल्याने अभिमान अन् समाधानाची भावना : PM नरेंद्र मोदी
पुणे : काशी आणि पुणे या दोन्ही शहरांची विशेष ओळख आहे. विद्वत्ता इथे चिरंजीव आहे, अमर आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. तिथं माझा सन्मान होणं यापेक्षा आयुष्यात अभिमानाची आणि समाधानाची भावना असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. ते पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, उपाध्यक्ष रोहित टिळक उपस्थित होते. (Prime Minister Narendra Modi honored with Lokmanya Tilak National Award)
आज या महत्वाच्या दिवशी मला पुण्याच्या या पावन भुमीवर महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असं म्हणतं पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी आहे. चापेकर बंधू यांची पवित्र धरती आहे. इथूनच ज्योतिबा फुले, सावित्रबाई फुले यांचे आदर्श जोडलेले आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी इथे येऊन जितका उत्साही आहे तेवढाच भावनिक आहे. मी आज दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. हे मंदीर पुणे जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. दगडूशेठ पहिले असे व्यक्ती होते, ज्यांनी टिळकांच्या आवाहनावर गणेश जयंतीची सुरुवात होण्यासाठी त्यांच्यासोबत जोडले गेले होते.
आज आपल्या सर्वांचे आदर्श आणि भारताचा गौरव असलेल्या बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. सोबतच आज आण्णा भाऊ साठे यांची जयंतीही आहे. मी या दोघांनाही नमन करतो. आण्णा भाऊ साठे यांचे समाजसुधारणेसाठीचे योगदान ते अप्रतिम आणि असाधारण आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळक आणि आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं. आज पुण्यात तुमच्या सगळ्यांमध्ये मला सन्मान मिळाला आहे तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. जी जागा, जी संस्था थेटपणे टिळकांशी जोडली गेली आहे, त्यांच्यामार्फत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. यासाठी मी हिंद स्वराज्य संघाचा आभारी आहे, अशी भावनाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
पुरस्काराचे पैसे नमामी गंगेसाठी दान :
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कारातून मिळालेली रक्कम नमामी गंगेसाठी दान करत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, काशी आणि पुणे या दोन्ही शहरांची विशेष ओळख आहे. विद्वत्ता इथे चिरंजीव आहे, अमर आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. तिथं माझा सन्मान होणं यापेक्षा आयुष्यात अभिमानाची आणि समाधानाची भावना असू शकत नाही.
आज त्या पुरस्काराला लोकमान्य टिळक यांचे नाव जोडले गेले आहे. त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. मी या पुरस्काराला 140 कोटी देशवासियांना अर्पण करतो. मी देशवासियांना आश्वस्त करतो की त्यांच्या सेवेत आणि आशा अपेक्षांच्या पुर्तीमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. या पुरस्कारासोबत मला जे पैसे मिळाले ते गंगेसाठी अर्पण करतो. हे पैसे मी नमामि गंगे योजनेसाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.