राष्ट्रवादीला धूळ चारत भाजपने केला पुणे बाजार समितीमध्ये शिरकाव
Pune APMC Election : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. तर 2 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त 3 जागावर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालासह पुणे बाजार समितीमध्ये भाजपचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले आहे.
कर्जत बाजार समितीत रोहित पवार-राम शिंदेंना बरोबरीत जागा, आता फेर मतमोजणी
आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतमोजणी होत आहे.
दरम्यान, नुकत्याच आलेल्या निकालानुसार बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला आहे. सध्या चालू असलेल्या मतमोजणीनुसार राष्ट्रवादीचे १८ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सर्वच जागा जिंकत राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला आहे.
दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन्ही निकाल जाहिर झाले असून विजयी उमेदवारांनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव ( वाघोली) हे सर्वाधिक ४०५ मते घेवून विजयी झाले आहेत.
तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) २५६ मते घेवून विजयी झाले आहेत. या गटात महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे पराभूत झाले आहेत.