प्रभाग 41 मध्ये निवृत्ती अण्णा बांदलांनी दिला 6200 मताधिक्याने शिवसेनेच्या शहरप्रमुखाला धक्का!
Nivrutti Anna Bandal यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 6200 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध केले आहे.
Pune Municiple Corporation Nivrutti Anna Bandal wins Ward 41, shocks Shiv Sena’s city chief with 6200 votes : पुणे महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून, प्रभाग क्रमांक ४१ (मोहम्मद वाडी – उंड्री) मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. बांदल यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 6200 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत या भागावर राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध केले आहे.
बड्या नेत्याचा पराभव आणि मताधिक्याचा विक्रम!
या निवडणुकीत संपूर्ण पुण्याचे लक्ष प्रभाग ४१ कडे लागले होते. येथे निवृत्ती अण्णा बांदल यांची थेट लढत शिवसेनेचे दिग्गज नेते प्रमोद नाना भानगिरे यांच्याशी होती. अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या या लढतीत बांदल यांनी सुरुवातीच्या फेरीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. अखेर, बांदल यांनी 6200 मतांचे विक्रमी मताधिक्य घेत भानगिरे यांचा दारुण पराभव केला. हा निकाल शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात असून बांदल यांच्या राजकीय वजनात यामुळे मोठी वाढ झाली आहे.
कामाच्या जोरावर मिळवलेले यश
निवृत्ती अण्णा बांदल यांचा हा विजय त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या जनसंपर्काचे आणि विकासकामांचे फळ असल्याचे बोलले जात आहे. मोहम्मद वाडी आणि उंड्री परिसरातील रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. “केलेली कामे आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळेच मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे,” अशा भावना बांदल यांनी निकालानंतर व्यक्त केल्या.
विजयाचे श्रेय कार्यकर्ते आणि कुटुंबाला
विजयाची घोषणा होताच बांदल समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना बांदल भावूक झाले होते. त्यांनी आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांना आणि कुटुंबाला दिले. ते म्हणाले,”हा विजय माझा नसून रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि कठीण काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या कुटुंबाचा आहे. जनतेने दिलेली ही जबाबदारी मी विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन.”या विजयामुळे प्रभाग ४१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात उंड्री-मोहम्मद वाडी परिसराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
