राष्ट्रवादीच्या बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका, नाहीतर.. ऊस निर्यातबंदीवर सदाभाऊंचा संताप

राष्ट्रवादीच्या बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका, नाहीतर.. ऊस निर्यातबंदीवर सदाभाऊंचा संताप

Sadabhau Khot : राज्यातील ऊस बाहेरच्या राज्यांना देण्यास राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर शेतकरी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारची नेहमीच पाठराखण करणारे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सुद्धा चांगलेच संतापले आहेत. ‘राज्य सरकारने हा आदेश तत्काळ मागे घ्यावा नाहीतर, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामात रस्त्यावर उतरेल. राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका अन्यथा आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालय हे शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणारे कोठार आहे. जर तुम्ही आमचं खळं लुटणार असाल तर या कार्यालयाला जाळून टाकू’, अशा शब्दांत खोत यांनी आपला संताप व्यक्त केला.

….त्यांना सनातन शब्दाचा अर्थ माहीत आहे का?, उदयनिधींच्या वक्तव्यावर RSS चा थेट सवाल

राष्ट्रवादीची वळू बैलं ठेचून काढू

राज्य सरकारने हा आदेश मागे घ्यावा यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करत असल्याचेही खोत म्हणाले. सरकारच्या या निर्णयावर मात्र त्यांनी वेगळी भूमिका मांडली आणि इशाराही दिला. ते म्हणाले, ‘राज्यात यंदा उसाला चांगला भाव मिळणार आहे. परंतु, सरकारला शेतकऱ्यांचा ऊस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे. म्हणून सहकार आयुक्त कार्यालयाने शेतकऱ्यांना कर्नाटकात ऊस घालण्यास बंदी केली आहे. शेतकऱ्यांवर हा मोठा अन्यायच आहे. आम्ही कष्ट करून पिकवलेला ऊस साखर कारखान्याला द्यावा, कर्नाटकला द्यावा? की गुजरातला द्यावा? याचा अधिकार शेतकऱ्याला आहे. परंतु, शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले की सरकारच्या पोटात दुखायला लागते.’

कर्नाटकात वाजतगाजत ऊस नेऊ, कोण आडवं येत तेच पाहू

‘या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो की राष्ट्रवादीच्या या वळू बैलांना शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका नाहीतर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी राष्ट्रवादीच्या या वळू बैलांना ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण, पु्ण्यातील सहकार आयुक्त कार्यालय हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणारे कोठार आहे. तुम्ही जर आमचं खळं लुटणार असाल तर हे साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू. म्हणून लवकरात लवकर हा आदेश मागे घ्यावा ही विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करत आहे. नाहीतर राज्यातला शेतकरी हा या गळीत हंगामात रस्त्यावर उतरेल पण, आम्ही कर्नाटकात वाजत गाजत ऊस घेऊन जाऊ आम्हाला कोण आडवं येतंय तेच पाहू’, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube