विष पचवायची तयारी ठेव आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही; वडिलांचा रोहित पवारांना कानमंत्र
Rajendra Pawar : इतिहासात आणि आताही अनेक बापांना रडता आले नाही आणि काळजीही करता येत नाही.
Rajendra Pawar On Rohit Pawar : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आमदार रोहित पवार (Rohit Pawar
) सक्रिय सहभागी आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेत्यांकडून त्यांच्यावर राजकीय टीका होत आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आंदोलनाची काय माहिती? प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रोहित पवारांची स्टंटबाजी असल्याची टीका आमदार राजेंद्र राऊत यांनी केली होती. तसेच मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार गोपीचंद पडळकर, विक्रम पाचपुते यांनी रोहित पवारांना घेरले आहे. त्यावरून आता रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार (Rajendra Pawar) हे बचावासाठी आले आहेत. त्यांनी थेट मुलासाठी आणि विरोधकांसाठी सोशल मीडियावर एक पत्रच काढले आहे. त्यात मुलासाठी भावनिक सादही त्यांनी घातलीय.
राजेंद्र पवारांचे जसे तसेच पत्र.
प्रिय रोहित, परवा MPSC च्या चालू आंदोलनात तुझ्यासोबत रस्त्यावर झोपलो. तुझा संघर्ष व कमिटमेंट असूनही विरोधक सतत म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधू लागलो. १९५४ ला ११० रुपये पगारावर माझे वडील आप्पासाहेब पवार नोकरीला लागले.२५ वर्षे नोकरी, उरलेली २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम.महाराष्ट्राला क्रॉसब्रीड गाईंची ओळख करून देऊन आजची ग्रामीण अर्थव्यवस्था दुधामुळे बदलली,१९८० ला ड्रिपचा प्रसार करून प्रथम पाणी बचतीचा मार्ग दाखवला. शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी काम केले,केंद्रसरकारने पद्मश्री दिली. शेवटपर्यंत सामाजिक काम करत असतानाही राजकारणी भावासाठी राजकीय मदत “थॅंकलेस जॉब” असला तरी करत राहिले.
पाचपुते-पवार संघर्षाचा नवा पायंडा; शरद पवार-अजित पवारांची भाषा रोहित पवारांच्या तोंडी
तुझा बाप १९७८ साली अवघे ५०० डॉलर घेऊन अमेरिकेला संघर्षातूनच शिक्षण घेण्यास गेला.तिथल्या झगमगाटीतील सोन्याचा चमचा न पाहता महाराष्ट्रातील स्वतःच्या शेतीत आला.शेती ही आनंद व संघर्षाचे मिश्रण आहे,हे करत एक नावाजलेली संस्था सामाजिक भावनेतून चालवत असतानाच मुरघास,कृषिक #Contract_Farming_in_Poultry व अनेक उपक्रमाची ओळख शेतकर्यांना करून देत आहे.
तुझे कॉलेज संपल्यानंतर तू एकटा नोकरी न करता हजारो ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत तू राजकारणात येण्यापूर्वी आपण स्वत:ची इंडस्ट्री उभी केली. लहानपणी तुला भारी खेळणी नव्हती म्हणून तू गड्यांची पोरं घेऊन मासे,खेकडे पकडायला ओढ्याने जायचास.ते धरताना बिळ सापाचे का खेकड्याचे याचा विचार न करता त्यात हात घालायचास,तुझी हात घालण्याची ही धाडसी सवय त्यामुळेच तयार झाली असावी.पण तू आता राजकारणात आहेस, राजकारणातील एखादा विषारी साप जर कधी डसला तर विष पचवायची तयारी ठेव,आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही!
इतिहासात आणि आताही अनेक बापांना रडता आले नाही आणि काळजीही करता येत नाही.उभारणीच्या संघर्षात वेळ गेल्यामुळे लहानपणी खेळवताही आले नाही पण आता तुझ्या पाठीशी आहे. “लढ,संघर्ष अटळ आहे,ना तुझा बाप राजकारणात होता ना तुझ्या बापाचे मोठे राजकारण आहे!” त्यामुळे तुझा सोन्याचा चमचा तुला मिळणारही नाही पण स्वतःसाठी राजकारण न करता हजारो तरुण पिढ्यांचे आणि गोरगरिबांचे सोने कर.
तुझा पाठीराखा बाप
राजेंद्र पवार
या पत्रात राजेंद्र पवार यांनी भावनिक साद घातलीच, शिवाय लढाऊ बाणा ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.