Ravindra Dhangekar कार्यालयात येताच मनसेलाही द्यावा लागला खुलासा!

Ravindra Dhangekar कार्यालयात येताच मनसेलाही द्यावा लागला खुलासा!

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुणे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे २ मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत, असे मनसेचे राज्य सचिव योगेश खैरे यांनी सांगितले आहे. तसेच खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत, असा खुलासा केला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये, असे मनसेचे राज्य सचिव योगेश खैरे यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube