मोठी बातमी! केतन अग्रवाल हत्याकांडात बीड कनेक्शन; सिया-चेतनच्या वर्गमित्राला अटक, WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासा?

पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या हत्येच्या कटाची रितेशला आधीपासून माहिती होती का, याचा तपास केला जात आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 05T193239.842

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात (Crime) पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. रितेश हिंगे असं या आरोपीचं नाव असून तो मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती आहे. यापूर्वी सिया आणि चेतन या दोघांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या तुरुंगात आहेत. आता रितेशच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी एक महत्त्वाचं वळण मिळालं आहे.

लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचं समोर आलं होतं. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी कट रचून त्याची हत्या केल्याचा आरोप समोर आला. या प्रकरणात दोघांना अटक केल्यानंतर आता रितेश हिंगे याच्याविरोधातही पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या हत्येच्या कटाची रितेशला आधीपासून माहिती होती का, याचा तपास केला जात आहे. चेतन चौधरी आणि रितेश यांच्यात झालेल्या WhatsApp संभाषणातून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. हे संभाषण रितेशने डिलीट केल्याचं सांगितलं जात असून, पोलिसांनी ते रिकव्हर केल्यानंतर त्यातून तपासाला दिशा मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे 18 जून रोजी केतनचा मृत्यू झाला, त्याच दिवशी सिया आणि चेतन यांनी रितेशलाही लोहगडावर सोबत येण्यास सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. हत्येनंतरही चेतन आणि सिया यांचा रितेशशी संपर्क असल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे हत्येच्या कटात रितेशची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

रितेश हिंगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून तांत्रिक पुरावे, संभाषण आणि आरोपींच्या संपर्काची माहिती तपासली जात आहे.

दरम्यान, नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, पोलिसांच्या तपासानुसार पडद्यामागे वेगळीच घटना घडत होती. केतनला किल्ल्यावरून खाली ढकलून ठार करण्याचा कट रचल्याचा आरोप सिया आणि चेतनवर आहे. मृत्यूच्या काही दिवस आधीही केतनला किल्ल्यावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर 18 जून रोजी पुन्हा त्याला लोहगडावरील उंच ठिकाणी नेण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे रितेशच्या अटकेनंतर या संपूर्ण हत्याकांडामागील कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

follow us