पुण्यात जागावाटपाचा तिढा चव्हाट्यावर; आरपीआयचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा चव्हाट्यावर.
RPI’s protest in front of BJP office in Pune : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप(BJP) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा आता चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या, 30 तारखेला संपत असताना, अद्यापही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला(RPI) नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्या कोणत्या प्रभागांमध्ये असतील, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील(Pune) भाजप कार्यालयासमोर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, कोअर कमिटीच्या बैठकींमध्ये आम्हाला अंधारात ठेवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जागावाटपाबाबतच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेता, फक्त आश्वासनांवर वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. “आम्ही युतीचा घटक पक्ष आहोत. तरीही आमच्याशी सन्मानाने वागले जात नाही,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं ठरलं; महापालिका निवडणुकांना सोबतच सामोरे जाणार
आंदोलनकर्त्यांनी असेही सांगितले की, या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर असलेला संभ्रम अधिकच वाढत असल्याचे आरपीआय नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, “जोपर्यंत भाजपकडून जागावाटपाबाबत स्पष्ट भूमिका मांडली जात नाही, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला सन्मानपूर्वक जागा दिल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही,” असा ठाम आणि आक्रमक पवित्रा आरपीआय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी करत त्यांनी युतीत समान न्यायाची मागणी केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना सुरू झालेल्या या आंदोलनामुळे भाजप–आरपीआय युतीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. या आंदोलनाचा निवडणूक प्रक्रियेवर आणि युतीच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
