गरीब रुग्णांसाठी 1000 डायलिसिस सेशन्स मोफत; साने गुरुजी तरुण मंडळाचा उपक्रम

Sane Guruji Tarun Mandal : पुण्यातील गरीब आणि गरजू किडनी रुग्णांसाठी साने गुरुजी तरुण मंडळाच्या पुढाकाराने 1000 मोफत डायलिसिस .

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 21T140432.863

Sane Guruji Tarun Mandal : आर्थिक परिस्थितीमुळे डायलिसिसचा (Pune)  खर्च परवडत नसलेल्या गरीब आणि गरजू किडनी रुग्णांसाठी साने गुरुजी तरुण मंडळ, हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण डायलिसिस सेंटरच्या वतीने मोफत डायलिसिसचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांसाठी एकूण 1000 डायलिसिस सेशन्स मोफत केले जाणार आहेत. ऑटर कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने या उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते झाला. साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात झालेल्या कार्यक्रमात ऑटर कंट्रोल्स इंडियाकडून देण्यात आलेला निधी जनकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह राजन गोऱ्हे, कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर, संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, ऑटर कंट्रोल्स इंडियाचे उल्हास कृष्णा जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

DJ च्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीसांचं पुणेकरांना आवाहन

किडनी विकार असलेल्या अनेक रुग्णांना नियमित अंतराने डायलिसिसची आवश्यकता असते. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा डायलिसिस करावे लागणाऱ्या रुग्णांसाठी हा उपचार दीर्घकाळ सुरू ठेवावा लागतो. मात्र, डायलिसिसचा खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठा भार ठरतो. त्यामुळे उपचारांची नितांत गरज असतानाही केवळ आर्थिक अडचणींमुळे उपचार घेता न येणाऱ्या रुग्णांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे.

एरंडवणे येथील जनकल्याण डायलिसिस सेंटरमध्ये या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय गरजेनुसार डायलिसिसची वारंवारता निश्चित केली जाईल. उपचाराच्या वेळी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार असून, रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही दिले जाणार आहे. विविध गरजू रुग्णांसाठी एकत्रितपणे 1000 डायलिसिस सेशन्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांच्या उपचाराचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

साने गुरुजी तरुण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानकडून यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. गरीब रुग्णांसाठी 5 रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या असून, दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. यंदा 350 हून अधिक विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क देवाभाऊ शिष्यवृत्ती योजनेतून भरण्यात आले असून, त्यासाठी 21 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. अभय भूतडा फाऊंडेशनने या उपक्रमासाठी अर्थसहाय्य केले.

कोविड महामारी, मुठा उजवा कालवा दुर्घटना, निसर्ग चक्रीवादळ आणि मराठवाड्यातील दुष्काळाच्या काळातही मंडळ आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतकार्य करण्यात आले आहे. आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासोबतच दिव्यांगांसाठी आवश्यक साहित्यही देण्यात आले. आतापर्यंत 1000 हून अधिक दिव्यांगांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. सामाजिक उपक्रमांची हीच मालिका पुढे नेत आता गरजू किडनी रुग्णांसाठी मोफत डायलिसिसची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

follow us