पुण्यात धाड टाकायला सांगलीचे पथक! तुकाराम मुंडे यांच्या निशाण्यावर ते 12 अधिकारी कोण?
पुण्यात FDA च्या अधिकाऱ्यांना माहिती न देता थेट सांगलीच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.
IAS Tukaram Mundhe News : अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आक्रमक कार्यपद्धतीचा धसका राज्यभरातील भेसळखोरांनी घेतला आहे. मात्र, गणेशोत्सव काळात पुण्यात करण्यात आलेल्या एका कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती न देता थेट सांगलीच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे पुण्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.
गणेशोत्सव काळात कर्नाटकातून पुण्यात आणलेले संशयास्पद पनीर आणि बार्शीहून आलेले खव्याचे दोन ट्रक भल्या पहाटे ताब्यात घेण्यात आले होते. बुधवार पेठेत अत्यंत गोपनीयतेने पार पडलेल्या या धडक कारवाईची खबर पुण्यातील स्थानिक अधिकाऱ्यांना लागूनही दिली गेली नव्हती. स्थानिक यंत्रणेला अंधारात ठेवून सांगलीच्या पथकाकडून धाड सत्र घडवून आणल्याने, पुण्यातील अधिकारी भेसळखोरांशी हातमिळवणी करून त्यांना पूर्वकल्पना तर देत नव्हते ना, असा संशय आता व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून पुणे विभागात अवघ्या २१ दिवसांत ८४९ आस्थापनांची झाडाझडती घेतली आहे. परंतु, या मोहिमेच्या आड पुणे एफडीएमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘अर्थपूर्ण’ तडजोडी चालू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पुण्यातील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावरील नियोजित कारवाई अचानक थांबणे, तसेच सोनाई व गोवर्धन दूध डेअरीवरील कारवायांचे तपास अहवाल गुलदस्त्यात राहणे, यावरून अनेक प्रकरणे दाबण्यात आल्याचा संशय निर्माण झाल्याची शक्यता आहे. या प्रकारांची गंभीर दखल घेत आयुक्तांनी गुप्त अहवाल मागवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली आणि मुंडे यांनी तातडीने कठोर पावले उचलत पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, अकोला आणि बुलढाणा येथील १२ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आणि चौकशीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, यात पुण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
स्वतःच्याच विभागात बसून भेसळखोरांना संरक्षण देणाऱ्या आणि कारवाईची माहिती लीक करणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा तुकाराम मुंडे पूर्णपणे बंदोबस्त कसा करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कारवाई जुनीच मात्र, ज्याप्रकारे कारवाई झाली याची चर्चा मात्र जोरदार सुरू झाली आहे.