Video : महाराष्ट्रातून पाठ फिरत नाही तोच, मोदींच्या ऑफरवर पवारांचा कारणासह पूर्णविराम
पुणे : पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” अशी मोठी ऑफर मोदींनी पवारांना दिली होती. त्यावर आता पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे देशाच्या हिताचं नाही त्यात माझं सहकार्य असणार नाही असे म्हणत मोदींनी दिलेल्या ऑफरवर पवारांनी पूर्णविराम दिला आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासोबत मी कधीच जाणार नाही असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, देशातील तीन टप्प्यातील मतदानातून मोदी सरकारच्या विरोधात जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसतंय. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची ही अस्वस्थता अशा गोंधळ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांतून दिसून येत आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील कोर्टाच्या निकालावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. बऱ्याच वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं. ठीक आहे आता कोर्टाने काहीतरी निकाल दिलाय. न्यायदेवतेचा हा निकाल आहे. यानंतर पत्रकारांनी विचारलं की या प्रकरणात मूख्य सूत्रधाराला निर्दोष सोडलंय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असे निदर्शनास आणून दिले. त्यावर पवार म्हणाले, यासाठी आता राज्य सरकारने एक अपील दाखल करावे आणि ही भूमिका न्यायालयात मांडावी.
व्यक्तिगत संबंध वेगळे आणि धोरणात्मक संबंध वेगळे. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली, असे माझे स्पष्ट मत आहे. दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली. याच्यामागे केंद्र सरकार आणि केंद्रीय नेतृत्वाची सहभाग असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाहीत. यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास आहे.
तीन टप्प्यांतील मतदानानंतर मोदी अस्वस्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अलीकडचे सगळी भाषणं समाजा-समाजामध्ये गैरविश्वास निर्माण करणासाठी पोषक आहेत. देशाच्या दृष्टीने आणि समाजासाठीही हे घातक आहे. जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी आणि आमचे सहकारी असणार नाहीत. तीन टप्प्यांतील मतदानाकडं पाहिलं तर मोदींच्या विचारांच्या विरोधात जनमत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची ही अस्वस्थता अशा विधानांतून व्यक्त होत असल्याचे पवार म्हणाले.