​ZP च्या शाळेत शिकलेली श्रावणी कुदळे NEET परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली, जाणून घ्या तिच्या यशाचे गुपित

सध्या दौंड तालुक्यातील खडकी येथील तिच्या निवासस्थानी अनेक मान्यवर प्रत्यक्ष भेट देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

News Photo   2026 07 17T175118.198

नीट यूजी २०२६ परीक्षेचा निकाल काल, १६ जुलै रोजी जाहीर झाला आहे. या निकालात पंजाबच्या आर्यन गुप्ताने ७१५ गुणांसह देशात अव्वल स्थान पटकावले आहे. तर नेहमीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपले वर्चस्व राखले असून, महाराष्ट्राची कन्या श्रावणी कृष्णा कुदळे हिने ९९.९९९६५ पर्सेंटाईलसह देशात पाचवा रँक मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने ६९० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या देशातील टॉप १३८ गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या राष्ट्रीय पातळीवरील मानाच्या यादीत महाराष्ट्राच्या तब्बल १५ हून अधिक विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत राज्याच्या गुणवत्तेचा डंका देशपातळीवर वाजवला आहे.

ओबीसी-एनसीएल प्रवर्गातून येणाऱ्या श्रावणी कुदळे हिने मुलींच्या आणि एकंदरीत राष्ट्रीय स्तरावर ५ वा क्रमांक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. श्रावणीच्या या यशापाठोपाठ महाराष्ट्राचा मोहीनीश मारुती भोसले यानेही ९९.९९९१५ पर्सेंटाईल मिळवत देशात १० वा रँक पटकावला आहे, ज्यामुळे देशातील टॉप १० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. तसेच, पाटील सार्थक महेश याने १४ व्या रँकवर झेप घेत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

​जिल्हा परिषदेच्या शाळेतून यशाची सुरुवात

​श्रावणीचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण दौंड तालुक्यातील गोपाळवाडी चोरमले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. प्राथमिक शिक्षणानंतर तिने आपले माध्यमिक शिक्षण माळेगाव येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कॉलेजमध्ये पूर्ण केले. ग्रामीण भागातील शासकीय शाळेत सुरुवातीचे शिक्षण होऊनही तिने घेतलेली ही झेप अत्यंत कौतुकास्पद आहे.

​यशामागे शिक्षक पालकांचे मार्गदर्शन

​श्रावणीचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. आपल्या मुलीने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे कुदळे कुटुंबासह संपूर्ण दौंड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सध्या दौंड तालुक्यातील खडकी येथील तिच्या निवासस्थानी अनेक मान्यवर प्रत्यक्ष भेट देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

​काय आहे श्रावणीच्या यशाचे गुपित?

​श्रावणीने तिच्या या प्रवासाबाबत आणि अभ्यासाच्या पद्धतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे

सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर:

श्रावणीने वर्षभर मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळला. सोशल मीडिया आणि मोबाईल स्क्रीनपासून दूर राहिल्यामुळे तिला अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले.

बारामतीत घेतली परीक्षेची तयारी:

तिने बारामती परिसरातील एका खाजगी क्लासमधून नीट परीक्षेची पद्धतशीर तयारी केली होती.

​सातत्य आणि निश्चित ध्येय:

“जर मनात निश्चित ध्येय असेल आणि कठोर परिश्रमात सातत्य ठेवले, तर ग्रामीण भागात राहूनही Neet सारख्या परीक्षेत सर्वोत्तम यश मिळवता येते,” असा विश्वास श्रावणीने यावेळी व्यक्त केला.

गुणवंत विद्यार्थी

१. कुदळे श्रावणी कृष्णा (रँक ५)
२. मोहीनीश मारुती भोसले (रँक १०)
३. पाटील सार्थक महेश (रँक १४)
४. सानिध्य क्षितिज डोंगरे (रँक २८)
५. अर्णव लाहोटी (रँक ३२)
६. टेंभुर्णे प्रणव पुरणलाल (रँक ३३)
७. राउशमित गुप्ता (रँक ३४)
८. पाटील सोहम निशिकांत (रँक ५३)
९. सागर राजेश कारिकर (रँक ६७)
१०. सौम्य बडोले (रँक ७७)
११. थोरात अनुश्री अजय (रँक ८५)
१२. आर्य अभिजित दिवेकर (रँक ९०)
१३. पटवेगार साहीम सादिक (रँक १०६)
१४. सुहान सलीम शेख (रँक ११६)
१५. अमीर फिदाएकैम वरावल्ला (रँक ११९)
१६. सार्थक पेठकर (रँक १२०)
१७. श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे (रँक १२२)
१८. गोपाल विजय पाटील (रँक १३७)

follow us