6 तास 30 मिनिटांचा जल्लोष; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला पहाटे निरोप

Shreemant Ganpati Visarjan : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक 6 तास 30 मिनिटांत पूर्ण झाली

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 27T164801.620

Shreemant Bhausaheb Rangari Ganpati Visarjan : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या (Pune) परंपरेतील मानाचं स्थान असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता पहाटे भक्तिमय वातावरणात झाली. बेलबाग चौकातून रात्री 9.30 वाजता सुरू झालेली मिरवणूक पहाटे 3.15 वाजता टिळक चौकातून पुढे मार्गस्थ झाली आणि बरोबर 4 वाजता पाताळेश्वर विसर्जन घाटावर बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. अशा प्रकारे संपूर्ण विसर्जन मिरवणूक 6 तास 30 मिनिटांत पूर्ण झाली.

मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर, भक्तांचा उत्साह आणि बाप्पाच्या जयघोषाने पुण्याचा परिसर दुमदुमून गेला. आकर्षक सजावटीचा रथ, ढोल-ताशांचा निनाद, पुष्पवृष्टी आणि विद्युत रोषणाईमुळे मिरवणुकीने भाविकांचं लक्ष वेधून घेतलं. उपलब्ध वृत्तानुसार मिरवणुकीत विविध वाद्य पथकांसह मर्दानी खेळांचंही सादरीकरण करण्यात आलं.

पालेकरांच्या हस्ते गौरव, बापटांचा डीजेवाल्यांवर हल्लाबोल; ‘शेण खा, गोमूत्र प्या, पण नागरिकांना त्रास देऊ नका’

दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मार्गावर अनेक गणेश मंडळांना मध्येच प्रवेश देण्यात आल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला काहीसा विलंब झाला. मात्र, त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ होत बाप्पाला वेळेत विसर्जनस्थळी नेण्यात आलं. टिळक चौकात पहाटेच्या सुमारास बाप्पाचं आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला यंदाही परंपरा आणि भक्तीची जोड मिळाली. 1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यामुळे या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला पुण्याच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक परंपरेचा विशेष मान आहे.

follow us