मुलगा आणि सून भाजपवासी; तुतारी मिरवणारे बापू पठारे कोणाचा करणार प्रचार?

Bapusaheb Pathare शरिरानं फक्त आमच्या सोबत, त्यांनी मुलाला तिकडे पाठवत आपला आत्मा तिकडेच पाठवलाय-अजित पवार

  • Written By: Published:
Son and daughter-in-law are BJP members;MLA Bapu Pathare campaign for?

PMC Election 2026 : संपूर्ण पुण्यात तुतारी चिन्हावर निवडून आलेले एकमेव आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) हे नव्या वादात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या त्यांच्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तुतारीच गायब केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातील सहा प्रभागांत 24 पैकी 14 भाजपचे (BJP) नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेनेचे तीन,तर एमआयएम पक्षाला एक जागा मिळाली होती. तेव्हा कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ, विमाननगर-लोहगाव, खराडी-वाघोली, कल्याणीनगर-वडगावशेरी आणि येरवडा-गांधीनगर असे हे 6 प्रभाग होते.

विधानसभेला 2024 मध्ये या मतदारसंघात भाजपचे नगरसेवक सर्वाधिक असतानाही भाजपमधून राष्ट्रवादीत (शरद पवार) गेलेले बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानंतर ते विजयी झाले होते. या विजयामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याचं बोलल्या गेलं. मात्र आता पालिका निवडणूक लागताच पठारे यांचा मुलगा आणि सुन दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश करताच पठारेंची भूमिका संशयास्पद वाटायला लागली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी पक्षप्रवेश केला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सुरेंद्र पठारे यांच्यासह पत्नी ऐश्वर्या आणि एका नातेवाईकाला, म्हणजेच पठारेंच्या घरात तीन जणांना उमेदवारी दिली. त्यामुळे पठारेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वप्न भंगलं होतं.
या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या.

मात्र, पठारेंनी एक तर तुतारीचा उमेदवार तिथं उभा राहणार नाही आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करतानाच मुलाला मदत होईल अशी भूमिका घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. ते जाहीरपणे नाही पण खाजगीरीत्या आपल्या मुलाचा आणि सुनेचा प्रचार करत आहेत. त्यासाठी ते आपल्या समर्थकांशी बोलत आहेत आणि छोट्या छोट्या कार्यक्रमांना उपस्थित राहून कमळाला मत द्या असे सांगत आहेत.

पठारे फक्त शरिरानं आमच्यासोबत पण…

आज झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्यासमोरच अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, ते शरिरानं फक्त आमच्या सोबत आहेत. त्यांनी मुलाला तिकडे पाठवत आपला आत्मा तिकडेच पाठवल्याचं म्हणच पठारेंना चांगलंच धुतलं आहे. आमदार म्हणून ज्या पक्षानं आपल्याला निवडून आणलं, त्याच पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या आशा अपेक्षांना पठारेंनी मुलगा आणि सत्तेच्या हव्यासापोटी पायदळी तुडवल्याचं, राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

follow us