Pune : लोकसभेचे तीन इच्छुक एकाच फोटोत अन् चौथा नेमला समन्वयक…

Pune : लोकसभेचे तीन इच्छुक एकाच फोटोत अन् चौथा नेमला समन्वयक…

पुणे : पुणे लोकसभा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत पुणे मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भिमालेंना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे शहरप्रमुख धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहरप्रमुख जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे असे नेते उपस्थित होते. (Srinath Bhimale appointed as Pune Lok Sabha Coordinator)

कोण आहेत श्रीनाथ भिमाले?

भिमाले यांनी 1998 साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तर 2002 पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय 2012 साली पुणे शहर सरचिटणीस आणि 2017 साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे.

या नियुक्तीबाबत बोलताना भिमाले म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आणि पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्याचा प्रयत्न आहे.

पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे.  संघटनेत आजवर मिळालेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडली असून नवी जबाबदारीही पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेतून निभावली जाईल, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

तीन इच्छुक तर चौथा समन्वयक :

शहर लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा भाजपमधील वारसदार कोण? असा सवाल विचारल्यास सद्यस्थितीमध्ये चार ते पाच नावे नक्की समोर येतात. काही दिवसांपूर्वीपर्यंत संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांची नावे यात आघाडीवर होती. त्यानंतर राजेश पांडे यांची पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती होताच त्यांचे नावही चर्चेत आले.

अलिकडील काही दिवसांत सुनील देवधर यांच्या नावाबद्दलही दबक्या आवाजात चर्चा होते. नुकताच त्यांनी पुणेरी पगडीतील फोटो टाकल्याने त्यांच्या नावाबद्दल पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या सहा चर्चांमधील नावांपैकी तीन नेत्यांसमोरच भिमाले यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube