पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात; 7 ते 8 गाड्यांची एकमेकांना धडक
पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघातांच्या घटना ताज्या असतानाच गोल्फ क्लब उड्डाणपुलाजवळ 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात.
Terrible accident in Yerwada : पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघातांच्या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा शहरातील येरवडा (Yerwada)भागात भीषण अपघाताची घटना घडली आहे. गोल्फ क्लब उड्डाणपुलाजवळ 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघाताने परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण होऊन गोंधळ झाला होता. अपघातानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणपुलावर गर्दीच्या वेळी अचानक वेगाने आलेल्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने 7 ते 8 गाड्या एकामागोमाग धडकल्या. धडक जोराची असल्यानं सगळ्याच वाहनांच या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र सुदैवानं यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातानंतर या उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मात्र येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) तात्काळ घटनास्थळी घाव घेत वाहतूक सुरळीत केली.
जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दरम्यान, घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अपघात झालेल्या वाहनांना बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची तीव्रता एवढी होती की, अक्षरश काही वाहन धडक बसल्यानंतर एकमेकांमध्ये घुसले. या अपघातामागचं नेमकं कारण अजूनपर्यंत समजू शकलेलं नसून येरवडा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सातत्यानं होणाऱ्या अपघातांमुळे पुणेकर त्रस्त झाले असून यावर काही तरी उपाययोजना करून तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
