Pune : बंदीचा सिग्नलही कळला नाही! निरा देवघर धरणात कार कोसळून तिघे बुडाले
पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात मोठा अपघात झाला आहे. घाटातील निरा देवघर धरणात एक चारचाकी कोसळून तिघे जण बुडाले असल्याची दुर्घटना घडली आहे. तर गाडीतील एकाला वाचविण्यात यश आलं आहे. शनिवारी (29 जुलै) पहाटे शिरगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. सर्वजण पुण्यातील रावेत येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. (four-wheeler fell into Nira Deoghar Dam in varandha Ghat Three people drowned)
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण प्रवास करत होते. त्यापैकी दोन पुरुष आणि एक महिला बुडाली आहे, तर एक पुरुष बचावला आहे. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
बंदीचा सिग्नल कळला नाही :
पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणारा वरंधा घाट पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गर्द झाडी, नागमोडी वळणं, अनेक धबधबे असा नजारा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या घाटात पाहायला मिळतो. याशिवाय मदास स्वामींची शिवथरघळ, आणि वाघजाई मंदीर याच घाटात आहे.
मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या घाटात दरडी कोसळण्याचे आणि रस्ते निसरडे होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रशासनाने सध्या या घाटातून वाहतूक बंद केली आहे. महाडची हद्द बंद असल्याने घाटातून गाडी पुढे जात नाही. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे चौघे याच घाटातून फिरायला बाहेर पडले असल्याचे सांगितले जात आहे.