हार्टऐवजी अस्थमावर उपचार! हरी नरकेंच्या मृत्यूला वेगळे वळण; ‘लिलावती’चे डॉक्टर आरोपीच्या पिंजऱ्यात
Hari Narake Passed Away : ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (9 ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Writer Sanjay Sonavani made many shocking revelations about Hari Narke’s death)
दरम्यान, नरके यांच्या मृत्यूला आता वेगळे वळण मिळाले आहे. ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ या कांदबरीचे लेखक संजय सोनावणी यांनी नरके यांच्या मृत्यूबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. नरके यांनी सोनावणी यांना 22 जून रोजी पाठविलेल्या काही मेसेजचे स्क्रीन शॉट त्यांनी शेअर केले आहेत. यात नरके यांनी मुंबईतील प्रसिद्ध लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे हे सर्व डॉक्टर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत.
प्रा. हरी नरके यांच्या मेसेजमध्ये काय होते?
“प्रिय भाऊ, नमस्कार,
गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन पुण्यात घरी पोहचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे. आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला. मात्र बीपी 60, 90 असे लो असून विकनेस खूप आहे.
लिलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो. जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते. हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता. लिलावतीमधील नामवंत कार्डिओलॉजिस्ट आणि पल्मिनॉलॉजिस्ट खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे त्यांनी हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिले. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.
लिलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे. पण त्यांनी वाचलाच नाही आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21 पट झाला होता. आता बरा होतोय.
नरके यांनी संजय सोनवणी यांना 22 जून 2023 रोजी हे व्हॉट्सअॅप मॅसेज केले होते.दरम्यान, त्यांच्या या मॅसेजवर “मी आता काय उत्तर देऊ माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?” अशी प्रतिक्रिया सोनवणी यांनी दिली आहे.