ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप पटकावला, टीम इंडियाचे काय चुकले?
World Cup 2023 Final: सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा सहा विकेटने ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) पराभव केला. 2003 प्रमाणे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता (World Cup Final) बनला आणि विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला. भारताने 50 षटकात सर्व गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. सुरुवातीला 3 विकेट झटपट पडल्यावर कांगारू दडपणाखाली आले होते पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी मैदानावर राहून सामना एकतर्फी केला. अशा प्रकारे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले.
भारतीय फलंदाज अपयशी ठरले
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट गोलंदाजांने भारताला 240 धावांत गुंडाळले. राहुल (107 चेंडूत 66 धावा, एक चौकार) आणि कोहली (63 चेंडूत 54 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करून भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नियमितपणे भारताला धक्के दिले. यामुळे भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली नाही. अखेरीस 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संपूर्ण टीम विश्वचषकात प्रथमच ऑलआऊट झाली.
IND vs AUS Final : बदली खेळाडू म्हणून आला पण, जिगरबाज ठरला; लाबुशेनची शानदार खेळी
रोहितशिवाय कोणत्याही खेळाडूला मोठे फटके मारता आले नाही
कर्णधार रोहित शर्माने (47) सुरुवातीला वेगवान खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी स्टार्क सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 55 धावांत तीन विकेट घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्स (34 धावांत दोन विकेट) आणि जोश हेझलवूड (60 धावांत दोन विकेट) यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मात्र, फलंदाजांच्या अति बचावात्मक वृत्तीमुळे भारताचेही नुकसान झाले. भारतीय डावात एकूण 12 चौकार आणि तीन षटकार मारले गेले. यापैकी शेवटच्या 40 षटकांत केवळ चार चौकार मारले गेले. यावरून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येते.
ऑस्ट्रेलियाची घातक गोलंदाजी
कमिन्सने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि गोलंदाजांनी आपला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. कर्णधार रोहित शर्माने (47) पुन्हा एकदा आपल्या आक्रमक वृत्तीचे दर्शन घडवले. जोश हेझलवूडवर दोन चौकार मारल्यानंतर त्याने पुढच्या षटकात लागोपाठ एक षटकार आणि एक चौकार लगावला.
Travis Head : आधी ‘कसोटी’ आता ‘वर्ल्डकप’! ‘हेड’ दोनदा ठरला टीम इंडियाची ‘डोकेदुखी’
शुबमन गिल (04) मात्र मिचेल स्टार्कच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना मिडऑनला अॅडम झाम्पाकडे गोलंदाजीवर झेलबाद झाला. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने सातव्या षटकात स्टार्कला सलग तीन चौकार मारून भारताची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली.
6.3 षटकांनंतर भारताचा खेळ बिघडला
भारताने आपले अर्धशतक 6.3 षटकात पूर्ण केले, जे वनडे विश्वचषक फायनलमधील कोणत्याही संघाचे सर्वात जलद अर्धशतक आहे. यानंतर रोहितने ग्लेन मॅक्सवेलच्या लागोपाठ चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारला पण पुढचा चेंडू हवेत उडाला आणि कव्हर्सवरून मागे धावताना ट्रॅव्हिस हेडने शानदार झेल घेतला. त्याने 31 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. गेल्या दोन सामन्यात शतके झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरने (04) मॅक्सवेलवर चौकार मारून खाते उघडले, पण पुढच्याच षटकात कमिन्सच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक जोश इंग्लिसकडे झेलबाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 81 धावांवर तीन विकेटसाठी अशी झाली होती. भारताचे 16व्या षटकात शतक पूर्ण झाले.
140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले, ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा ‘षटकार’
10 ते 40 षटकांपर्यंत कोहली आणि राहुलची संथ फलंदाजी
मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. यामुळे भारताची धावगती मंदावली. 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अय्यरने चौकार मारल्यानंतर भारताला पुढील चौकारासाठी 97 चेंडूपर्यंत वाट पाहावी लागली. लोकेश राहुलने 27व्या षटकात मॅक्सवेलच्या चेंडूवर फाइन लेगवर पॅडल स्कूपने चौकार मारला. कोहलीने 56 चेंडूत विश्वचषकातील सहावे अर्धशतक पूर्ण केले.
मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कमिन्सचा उसळणारा चेंडू विकेट्सवर खेळून कोहली बाद झाला. त्याने 63 चेंडूंच्या खेळीत चार चौकार मारले. राहुलने 86 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, हेझलवूडने रवींद्र जडेजाला (9) यष्टिरक्षक इंग्लिसला झेलबाद करून भारताची धावसंख्या पाच विकेट्सवर 178 धावांवर नेली.
वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय वायुसेनेची सलामी; पाहा फोटो
सूर्यकुमार पुन्हा अपयशी ठरला
राहुलच्या पहिल्या चौकारानंतर भारताला पुन्हा एकदा चौकारासाठी 75 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. सूर्यकुमारने 39व्या षटकात चौकार मारला. अशाप्रकारे भारताला 11व्या ते 40व्या षटकापर्यंत केवळ दोनच चौकार मारता आले. राहुलने 41व्या षटकात झम्पाच्या चेंडूवर धाव घेत भारताच्या 200 धावा पूर्ण केल्या. यानंतर कमिन्सने पुन्हा एकदा स्टार्ककडे चेंडू सोपवला आणि यावेळी राहुलला यष्टिरक्षक इंग्लिसकडे झेलबाद केले.
राहुलने 107 चेंडूत केवळ एक चौकार मारला. स्टार्कने पुढच्याच षटकात मोहम्मद शमीलाही (6) इंग्लिशकरवी झेलबाद केले. सूर्यकुमारने शेवटच्या षटकांमध्ये वेगवान धावा काढण्याची भारताला अपेक्षा होती पण तोही हेझलवूडच्या स्लो बाउन्सरवर इंग्लिशच्या हाती झेलबाद झाला. त्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव (10) धावबाद झाल्याने भारताचा डाव संपुष्टात आला.
IND vs AUS Final : मला बोलावलंच नाही! BCCI च्या कारभारावर कपिल देव नाराज
ट्रॅव्हिस हेड पुन्हा नडला
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सुरुवातीचे 10 षटकं कठीण होते. या वेळी 3 विकेट पडल्या आणि छोट्या लक्ष्याचा बचाव करण्यात टीम इंडिया यशस्वी होईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. डेव्हिड वॉर्नर (7), मिचेल मार्श (15) आणि स्टीव्हन स्मिथ (4) यांच्या विकेट्स पडल्या. जसप्रीत बुमराहच्या नावावर दोन विकेट, तर एक विकेट मोहम्मद शमीच्या खात्यात गेली.
यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी डाव सावरला. रिकी पाँटिंगप्रमाणेच ट्रॅव्हिस हेडने एकतर्फी शतक झळकावून भारताच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. हा तोच ट्रॅव्हिस हेड आहे, ज्याने यंदाच्या WTC फायनलमध्ये मॅच-विनिंग इनिंग खेळली होती.