बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदी पुन्हा चेतन शर्मा
मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदी पुन्हा चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 7 जानेवारी 2023 रोजी अखिल भारतीय वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या अपयशानंतर बीसीसीआयने मोठी कारवाई करत निवड समितीची हकालपट्टी केली. त्यानंतर लगेचच बीसीसीआयनेही अर्ज मागवले होते, ज्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर होती. चेतन शर्माने पुन्हा मुख्य निवडकर्ता होण्यासाठी अर्ज केला होता.
शनिवारी बीसीसीआयने चेतन शर्मा यांची निवड समितीच्या प्रमुखपदी फेरनियुक्ती केली. निवड समिती पॅनेलमधील इतर निवडकर्त्यांमध्ये दक्षिण विभागातून एस शरथ, मध्य विभागातून एसएस दास, पूर्व विभागातून सुब्रतो बॅनर्जी आणि पश्चिम विभागातून सलील अंकोला यांचा समावेश आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश, माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया, माजी डावखुरा फिरकी गोलंदाज मनिंदर सिंग, निखिल चोप्रा, शिव सुंदर दास, अजय रात्रा यांच्यासह काही प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेटपटू यांची नावे शर्यतीत मोठी नावे होती. माजी निवडकर्ता चेतन शर्मा यांचेही नाव यात पुढे आले होतेच. अशा वेळी BCCIने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कायम ठेवले.