‘खेलो इंडिया’तून ‘608 कोटी’ निधी अन् एशियन गेम्समध्ये मेडल ‘0’ : गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका

‘खेलो इंडिया’तून ‘608 कोटी’ निधी अन् एशियन गेम्समध्ये मेडल ‘0’ : गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये भारताने जवळपास 107 पदकांची लयलूट केली. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 655 खेळाडूंसह भाग घेतला होता. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा 2022 मध्ये होणार होती, परंतु कोविड-19 मुळे ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. (Congress criticized the Gujarat model and Prime Minister Narendra Modi over his performance in the Asian Games)

या स्पर्धेत भारताने 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांसह 107 पदकांची लयलूट केली. यासह, भारताने 2018 मध्ये जकार्ता येथे पार पडलेल्या स्पर्धेतील स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. यात भारताच्या 570 खेळाडूंच्या सहभागासह उतरलेल्या 16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कांस्यपदकांसह एकूण 70 पदके जिंकली होती. दरम्यान. याच स्पर्धेतील आता एका आकडेवारीवरुन वाद सुरु झाला आहे.

गुजरात मॉडेलवरुन काँग्रेसचा हल्लाबोल :

या स्पर्धेत भारताने 107 पदके जिंकली. त्यात गुजरात राज्यातील एकाही खेळाडूने पदक मिळविलेले नाही, असा दावा करत काँग्रेसने गुजरात मॉडेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने याबाबत युट्यूबवर एक व्हिडीओ तयार केला आहे. यात म्हंटले की, एशियन गेम्समधेय गुजरातच्या एकाही खेळाडूला पदक जिंकता आलेले नाही. पण त्याचवेळी गुजरातला खेलो इंडिया स्पर्धेअंतर्गत सर्वात जास्त निधी देण्यात आला. तर सर्वात कमी निधी मिळालेल्या पंजाब आणि हरियाणा या राज्यांतील खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकली असा दावा काँग्रेसने केला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची कामगिरी :

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 5 पदके जिंकून शानदार सुरुवात केली. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने 6 पदके जिंकली. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारताने अनुक्रमे 3, 8 आणि 3 पदकांवर कब्जा केला. भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा क्रम इथेच थांबला नाही. सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी भारताने अनुक्रमे 8, 5, 15 आणि 7 पदके जिंकली. भारतीय खेळाडूंनी दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या दिवशी अनुक्रमे 9, 12, 5, 9 आणि 12 पदके जिंकली.

भारताची सर्वोत्तम कामगिरी
यापूर्वी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदके जिंकली होती. पण आता भारतीय खेळाडूंनी आपले जुने विक्रम मागे टाकले आहेत. मात्र, 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनचा दबदबा दिसून आला. चीनने 194 सुवर्णांसह 368 पदके जिंकली. यानंतर जपानने 48 सुवर्णांसह 177 पदके जिंकली. दक्षिण कोरिया 39 सुवर्ण पदकांसह तिसर्‍या स्थानावर आहे. तर भारत चौथ्या स्थानावर राहिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube