IND vs NZ यांच्यात रंगणार निर्णायक टी-20 सामना
अहमदाबाद: भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) अखेरचा तिसरा टी-20 (3rd T20) क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.
आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘जिंकू किंवा मरू’ असा असणार आहे. पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता, तर दुसरा सामना यजमान भारताने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती.
त्यामुळे मालिका कोण जिंकणार, याचा फैसला बुधवारी होणार असल्याने तिसऱ्या लढतीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. उभय संघ तुल्यबळ असल्यामुळे अखेरच्या लढतीबद्दलची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.
यजमान भारताने न्यूझीलंडला टी-20 मालिकेत 2017 व 2021मध्ये पराभूत केलेले आहे. त्यामुळे आज सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताला मालिकाविजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
न्यूझीलंडने 2012 मध्ये भारताला भारतात 1-0 फरकाने हरवून टी-20 मालिका जिंकली होती. त्यामुळे 11 वर्षांनंतर भारतामध्ये पुन्हा एकदा टी-20 मालिका जिंकण्यासाठी न्यूझीलंडचा संघही मैदानावर सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
हार्दिक पंडयाच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकदाही टी-20 मालिका गमावलेली नाहीये. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने तीन टी-20 मालिका जिंकल्या आहेत. हार्दिकची सेना आता मालिकाविजयाच्या चौकारासाठी सज्ज झाली आहे.
मात्र दुसऱ्या टी-20 लढतीत 100 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय फलंदाजांना अखेरच्या षटकापर्यंत वाट बघावी लागली होती. त्यामुळे न्यूझीलंडचा संघही तेवढ्याच तयारीने मैदानावर उतरेल.