पाकिस्तानला धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असणार हायब्रीड मॉडेल, टीम इंडिया ‘या’ देशात खेळणार सामने
Champions Trophy 2025 : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) जाणार का? या प्रश्नवार गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ (Team India) पाकिस्तानमध्ये जाणार का याबाबत निर्णय केंद्र सरकार घेणार असं काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने (BCCI) सांगितले होते. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल (Hybrid Model) अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आपले सर्व सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) खेळू शकते.
माहितीनुसार, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध सामने दुबईमध्ये खेळू शकते.अशी माहिती द टेलिग्राफने दिली आहे. तसेच जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर या सामन्यांसाठी ठिकाण बदलू शकते किंवा दुबईत देखील हे सामने होऊ शकते आणि जर भारतीय संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचला नाही तर हे सामने लाहोरमध्ये होणार अशी देखील माहिती समोर आली आहे.
ड्राफ्ट वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार असून या स्पर्धेचे उपांत्य फेरी सामने आणि अंतिम सामना लाहोरमध्ये होणार आहेत. तर या ड्राफ्टनुसार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 1 मार्चला होणार आहे. तर दुसरीकडे यापूर्वी देखील आशिया चषक 2023 चे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आले होते मात्र भारतीय संघाचे सर्व सामने हायब्रीड मॉडेल अंतर्गत श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी काही दिवसांपूर्वी अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी आम्ही नेहमी सरकारची परवानगी घेतो असे आमचे धोरण आहे. आमच्या संघाने कोणत्याही देशाचा दौरा करायचा की नाही हे हे सरकार ठरवते आणि याबाबत देखील सरकार निर्णय घेईल आणि आम्ही त्याचे पालन करू असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले होते.
राजकीय मुद्द्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यात आलेली नाही. भारतीय संघाने 2008 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.