World Cup : दहा वर्षात नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव : टीम इंडिया बनली ‘नवी’ चोकर्स?

World Cup : दहा वर्षात नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव : टीम इंडिया बनली ‘नवी’ चोकर्स?

क्रिकेट जगतात आजवर केवळ दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ चौकर्स म्हमून ओळखला जात होता. पण आता टीम इंडियावरही (India) हाच शिक्का बसताना दिसत आहे. कारण ज्या पद्धतीने आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ धडाकेबाज पद्धतीने सुरुवात करतो आणि नॉकआऊट मॅचमध्ये कच खाऊन खराब कामगिरी करतो, अगदी त्याचप्रमाणे टीम इंडियाही मागील 10 वर्षांत आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी करत आहे. मात्र या सर्व स्पर्धांच्या नॉक आऊट सामन्यांमध्ये मात्र भारताची कामगिरी अत्यंत खराब आणि सुमार राहिली आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांत भारताला तब्बल नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. यात काल वर्ल्डकप फायनलच्याही मॅचमधील पराभवाचाही समावेश आहे. (In ten years, India has had to accept defeat in nine ICC knockout matches)

चोकर्स म्हणजे काय?

चोकर्स हा शब्द ‘चोक’ या शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ होतो, ऐनवेळी, मोक्याच्या क्षणी कच खाणे, अडखळणे किंवा चुका करुन हातातील गोष्ट गमावून बसणे असा होता.

दक्षिण आफ्रिकेला चोकर्सचा टॅग का मिळाला?

आयसीसीच्या मोठ्या सामन्यांमध्ये किंवा बाद फेरीतील मॅचेसमध्ये कच खाण्याच्या वृत्तीमुळेच दक्षिण आफ्रिकेच्या धुरंधर टीमला चौकर्स म्हटले जाऊ लागले. वर्ल्डकपमधील नॉकआऊट मॅचेसमध्ये विरोधी टीमवर अॅटॅक करुन तुटून पडण्याऐवजी ही टीम मागे पडते आणि ट्रॉफीपासून दुरावते. दक्षिण आफ्रिकेवर चोकर्स म्हणून शिक्कामोर्तब झाला 1999 मध्ये झालेल्या पराभवानंतर. पण 1992 आणि 1996 मध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभावनंतर त्यांना चोकर्स म्हणायला सुरुवात झाली. त्यानंतरच्याही अनेक अटीतटीच्या आणि नॉक आऊट सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा पॅटर्न कायम राहिला. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड सारख्या टीमकडून 13 रन्सनी हारल्यामुळे बाहेरचा रस्ता पकडावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्येही दक्षिण आफ्रिकेची टीम ढेपाळली होती.

भारताला का मिळत आहे हा टॅग?

भारताने 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 2011 चा वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर मात्र टीम इंडिया आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. मागील दहा वर्षांमध्ये टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफीच्या सर्व स्पर्धांमध्ये चांगली सुरुवात केली, धडाकेबाज कामगिरी करत नॉकआऊटपर्यंत मजल मारली. पण नॉक आऊट सामन्यांमध्ये टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली नाही. जवळपास सगळ्या मॅचेस या विरोधी टीमने एकतर्फी जिंकले होत्या.

आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी (2013 नंतर):

2014 T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताला पराभव पाहायला लागला होता. श्रीलंकेने सहा विकेट्स आणि दोन ओव्हर्स राखून ही फायनल मॅच जिंकली होती. त्या मॅचमध्येही भारताची बॅटिंग, बॉलिंग पूर्ण ढेपाळली होती.

2015 क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनलला भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाने धमाकेदार सुरुवात करत 328 धावांचा डोंगर उभा केला. पण भारताला ते आव्हान पेलवले नव्हते. संपूर्ण भारतीय संघ 233 धावांवर ऑलआऊट झाला होता.

IND vs AUS Final: भारताच्या पराभवानंतर अनुष्का अन् विराटच्या ‘त्या’ फोटोची जोरदार चर्चा !

2016 T20 वर्ल्डकपच्या सेमी फायनललामध्ये भारताचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला होता. भारताने चांगली बॅटिंग करत वेस्ट इंडिजसमोर 192 धावांचे आव्हान उभे केले होते. पण भारतीय बॉलर्सने पूर्णपणे निराशा केली होती. वेस्ट इंडिजने तब्बल 7 विकेट्सने ती मॅच जिंकली होती.

2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या आव्हानापुढे भारतीय टीम 158 रन्सवर गुंडाळली होती. पाकिस्तानचा तब्बल 180 रन्सने विजय झाला होता.

2019 मधील वर्ल्डकप सेमीफायनलमधील पराभव आजपर्यंत भारतीय विसरु शकलेले नाहीत. संपूर्ण भारतीय बॅटिंग लायनअप त्या मॅचमध्ये फेल गेली होती. न्यूझीलंडला 239 रन्स  धावांत रोखल्यानंतर भारतीय बॅट्समनची हाराकिरी पाहायला मिळाली होती. केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक हे स्पर्धेतील आघाडीचे बॅट्समन दुहेरी रन्सही करु शकले नव्हते. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या रनआऊटमुळे भारतीय टीम पराभूत झाली होती.

दोन वर्षांच्या सर्वोत्तम कामगिरीने 2021 मधील पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताने धडक मारली होती. मात्र फायनल मॅचमध्ये दोन्ही डावांत भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सने निराशजनक कामगिरी केली होती.  न्यूझीलंडने 8 विकेट्सने भारताचा धुव्वा उडवला होता.

IND vs AUS Final : …म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; नेटकऱ्यांकडून अहमदाबादचे प्रेक्षक टार्गेट

2022 T20 वर्ल्डकप सेमीफायनलमधील पराभवही भारताच्या जिव्हारी लागला होता. त्या मॅचमध्ये विराट कोहली आणि हार्दिक पांड्या वगळता एकही बॅट्समन चांगला खेळू शकला नव्हता. त्यानंतर इंग्लंडच्या टीमने 10 विकेट्सने ती मॅच जिंकली होती. एकाही भारतीय बॉलरला यश मिळाले नव्हते.

2023- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा दुसऱ्यांदा पराभव झाला होता. 2021 ते 2023 या काळात टेस्टमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन टीम फायनलमध्ये पोहचल्या होत्या. मात्र या मॅचमध्येही भारताला पराभवाची चव चाखायला लागली होती. भारतीय बॅट्समन आणि बॉलर्स फेल ठरले होते.

2023 क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये भारताला नुकताच पराभव स्वीकारावा लागला. साखळी फेरीतील सर्व सामने आणि सेमीफायनल जिंकत भारताने फायलनमध्ये धडक मारली होती. पण फायनलमध्ये भारताला बॅट आणि बॉलनेही चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा 6 विकेट्सने धुव्वा उडाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube