शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत! पाकिस्तानला अखेरच्या चेंडूवर धक्का; भारतानं जिंकलं आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक
IND vs PAK : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 19 धावांनी मात करत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (India) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील अंतिम सामना अखेर भारतानं 19 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतील सुवर्णपदकावर पुन्हा एकदा नाव कोरलं. पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर श्रीलंकेला कांस्यपदक मिळालं. सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूपर्यंत लांबला आणि अखेर भारतानं संयमी खेळ करत सामना आपल्या बाजूनं झुकवला.
नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन लवकर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मानं डावाची धुरा सांभाळली. त्यानं 28 चेंडूंत 61 धावांची आक्रमक खेळी करत 3 चौकार आणि 7 षटकार ठोकले. त्यानंतर श्रेयस अय्यरनं 21 आणि ईशान किशननं 20 धावांचं योगदान दिलं.
डावाच्या अखेरीस तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी भारताच्या धावसंख्येला वेग दिला. दोघांनी मिळुन सहाव्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. दुबेनं 15 चेंडूंत 27 धावा केल्या, तर तिलकनं अवघ्या 22 चेंडूंत नाबाद 51 धावांची खेळी केली. या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 6 गडी गमावत 211 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 212 धावांचं लक्ष्य ठेवलं.
44 वर्षानंतर भारताला रौप्यपदक! पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये आर्मीमॅन सावन बरवालची कामगिरी
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळली आणि 39 धावांवर त्यांचे 3 गडी बाद झाले. मात्र हसन नवाजनं डाव सावरत भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. त्यानं 51 चेंडूंत 5 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं 96 धावांची झंझावाती खेळी केली. पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही, मात्र नवाजच्या खेळीमुळं सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार राहिला.
पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी 33 धावांची गरज होती. हसन नवाज शतकाच्या उंबरठ्यावर उभा असताना शिवम दुबेच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. अखेरच्या चेंडूवर नवाज बाद झाला आणि त्याची खेळी 96 धावांवर थांबली. पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 192 धावांवर थांबल्यानं भारतानं सामना 19 धावांनी जिंकला.
या विजयासह भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटचं सुवर्णपदक कायम राखलं. अंतिम सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माच्या फलंदाजीपासुन ते अखेरच्या षटकातील गोलंदाजीपर्यंत भारतीय संघानं महत्त्वाच्या टप्प्यांवर केलेल्या कामगिरीमुळं सामना आपल्या ताब्यात ठेवला. पाकिस्तानच्या हसन नवाजच्या 96 धावांच्या खेळीनं सामन्यात रंगत निर्माण केली, मात्र भारतानं अखेरच्या क्षणी बाजी मारत सुवर्णपदक निश्चित केलं.