ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचे वर्चस्व, गोलंदाजांनंतर फलंदाजीही दमदार
INDW vs AUSW : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (INDW vs AUSW) यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर होता. गोलंदाजांनंतर फलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियन संघ 219 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 1 गडी बाद 98 धावा आहे.
पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडिया ऑस्ट्रेलियापेक्षा 121 धावांनी मागे आहे. सध्या भारताकडून स्मृती मानधना आणि स्नेह राणा क्रीजवर आहेत. स्मृती मानधना 43 धावा करून नाबाद परतली. तर स्नेह राणा 4 धावांवर नाबाद आहे. याआधी भारताची सलामीवीर शेफाली वर्मा 40 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतली. शेफाली वर्माला जेस जॉन्सनने बाद केले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. दोन फलंदाज 7 धावांवर बाद झाले. यानंतरही पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा सिलसिला सुरूच होता. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 219 धावांवर गारद झाला.
मलिक, भाजपचा गेम प्लॅन अन् अजितदादा गटाला शंका; पवारांना घटस्फोट देण्याची भाजपची पूर्वतयारी ?
ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅकग्राने सर्वाधिक 50 धावा केल्या. याशिवाय बेथ मुनी, अॅलिसा हिली आणि जेस जॉन्सन यांसारख्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, परंतु त्यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही.
भारताकडून पूजा वस्त्राकर ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. पूजा वस्त्राकरने 4 फलंदाजांना बाद केले. याशिवाय स्नेह राणाला 3 विकेट मिळाल्या. तर दीप्ती शर्माने 2 विकेट घेतल्या.
आयपीसी, सीआरपीसी अन् पुरावा कायदा बदलण्याचा मार्ग मोकळा, राज्यसभेत विधेयक मंजूर
शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांची चांगली सुरुवात
ऑस्ट्रेलियाच्या 219 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. शेफाली वर्मा 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. शेफाली वर्माला जेस जॉन्सनने बाद केले. ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत फक्त जेस जॉन्सनला विकेट मिळाली आहे.