अटीतटीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय

अटीतटीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय

हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावाने पराभव केला. गिलच्या 208 धावांच्या जोरावर भारताने 349 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत न्यूझीलंडने सर्वबाद 337 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून सर्वाधिक मायकल ब्रेसवेलने 78 चेंडूंत 140 धावा करत सामन्यात चांगलीच रंगत भरली. पण अखेरच्या षटकात त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले आणि भारताला 12 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मोहम्मद सिराजने या सामन्यात सर्वाधिक चार विकेट्स मिळवल्या.

न्यूझीलंडची सुरुवात डळमळीत झाली. कारण न्यूझीलंडला एकामागून एक धक्के बसत गेले. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला त्यांना चांगली भागीदारी रचला आली नाही. कारण न्यूझीलंडची 4 बाद 89 अशी अवस्था झाली होती. त्यानंतरही स्टँनर आणि ब्रेसवेलने न्यूझीलंडचा डाव सावरला मिचेल सँटनरने 57 धावांची दमदार खेळी साकारली आणि त्याची ही खेळी ब्रेसवेलला आधार देणारी ठरली.

गिलने आजचा दिवस गाजवला. गिलने यावेळी सलग तीन षटकार लगावले आणि पहिल्या वहिल्या द्विशतकाला गवसणी घातली. गिलने यावेळी 149 चेंडूंत 19 चौकार आणि 9 षटकारांच्या जोरावर 208 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. गिलने आजच्या या खेळीची सुरुवात थोडीशी शांतपणे केली खरी, पण दोनशे धावा या त्याने सलग तीन षटकार खेचत पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले.

गिल हा भारताचा पाचवा द्विशतकवीर ठरला. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी यापूर्वी भारताकडून खेळताना द्विशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर गिल हा द्विशतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम इशान किशनच्या नावावर होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube