ईशान किशानचे वादळी द्विशतक; कोहलीचे तीन वर्षानंतर ‘विराट’ शतक

ईशान किशानचे वादळी द्विशतक; कोहलीचे तीन वर्षानंतर ‘विराट’ शतक

ढाका : बांगलादेशविरूद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 409 धावा केल्या.

तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. यानंतर मात्र विराट कोहली आणि ईशान किशनने जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी 290 धावांची विक्रमी भागिदारी केली.

ईशान किशनने आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. अवघ्या 131 चेंडूत त्याने 210 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने 24 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे केलेले हे सर्वात जलद द्विशतक आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीने तब्बल तीन वर्षानंतर शतकी खेळी केली. त्याने 91 चेंडूत 111 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या दोघानंतर मात्र भारतीय संघाची पुरती घसरगुंडी उडाली. श्रेयस अय्यर 3, लोकेश राहुल 8 धावा काढून बाद झाले. यानंतर अक्षर पटेल 20, वॉश्गिंटन सुंदरने 37 धावा केल्यामुळे भारताची धावसंख्या 400 च्या पुढे गेली.

बांगलादेशकडून गोलंदाजीत शकिब अल हसन, इबादत हुसेन आणि टस्किन अहमदने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. फिरकीपटू मेहदी हससला 1 बळी घेण्यात यश आले. बांगलादेशकडून टस्किन अहमद सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 9 षटकांत 89 धावा दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube