प्रियांश आर्यचा मैदानात धुमाकूळ! 181 धावा ठोकत ख्रिस गेलचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Priyansh Arya 181 Runs : दिल्लीचा कर्णधार प्रियांश आर्यने तामिळनाडूविरुद्ध 68 चेंडूंत 181 धावा ठोकत टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम केला.
Priyansh Arya 181 Runs : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मैदानावर (Delhi) दिल्लीचा कर्णधार प्रियांश आर्यने आपल्या फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तामिळनाडूविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या 68 चेंडूंमध्ये 181 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या खेळीत त्याने तब्बल 19 षटकार आणि 7 चौकार लगावले. विशेष म्हणजे, अवघ्या 36 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करणाऱ्या प्रियांशने टी-20 क्रिकेटमधील ख्रिस गेलचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.
इंदूर येथील डेली कॉलेज मैदानावर मंगळवारी (24 नोव्हेंबर) दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात एलिट ग्रुप बीचा सामना पार पडला. या सामन्यात प्रियांशने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. यापूर्वी 2013 मध्ये ख्रिस गेलने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद 175 धावा केल्या होत्या. प्रियांशने 181 धावांची खेळी करत गेलचा हा विक्रम मागे टाकला. टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मात्र दक्षिण आफ्रिकेच्या लुआन-ड्रे प्रिटोरियसच्या नावावर आहे.
भारत आणि न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित; भारताच्या हातून विजय निसटला
प्रियांशच्या या खेळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने एका डावात 19 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. यासह त्याने न्यूझीलंडचा फलंदाज फिन ॲलन याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. फिन ॲलनने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध 19 षटकार मारले होते. प्रियांशने भारतीय फलंदाजाची टी-20 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या, कर्णधार म्हणून सर्वोच्च खेळी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या असे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
दरम्यान, दिल्लीच्या डावाची सुरुवात मात्र अडखळत झाली. गुर्जपनीत सिंगने यश धुलला अवघ्या 8 धावांवर बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यावेळी संघाची धावसंख्या 30 होती. त्यानंतर प्रियांश आर्य आणि नितीश राणा यांनी डावाला आकार दिला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत प्रियांशने 89 धावांचे योगदान दिले. त्याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावत तब्बल 275 धावांचा डोंगर उभा केला.